कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:47 AM2024-06-05T10:47:09+5:302024-06-05T10:50:00+5:30

कोथरूड आणि वडगावशेरीत मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने उपनगरातील मतदारांचा कौल निर्णायक ठरला आहे. या मतदारसंघात वंचित, एमआयएमचा फॅक्टर चालला नाही.... (Pune Lok Sabha 2024 Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More)

Kothrud, Vadgaonsheri, Parbati decided Pune MP; Deprived in Pune, MIM factor missing | कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

Pune Lok Sabha Result 2024| पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांना कोथरूड, वडगावशेरी, पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. केवळ पुणे कॅन्टोन्मेेंट मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे. कोथरूड आणि वडगावशेरीत मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने उपनगरातील मतदारांचा कौल निर्णायक ठरला आहे. या मतदारसंघात वंचित, एमआयएमचा फॅक्टर चालला नाही.

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. तर रवींद्र धंगेकरांच्या रूपाने कसब्याची एकमेव जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे.

बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे?

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी इतिहास घडवत भाजपला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी रंगत आणली. पण, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका रवींद्र धंगेकर यांना बसला. या निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराच्या टप्प्यात विदर्भातील दहा आमदार काँग्रेस नेतृत्वाने गटबाजी रोखण्यासाठी आणले होते. पण, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. या निवडणुकीत शिवसेेनेच्या ठाकरे गटाने सर्वाधिक प्रमाणिकपणे काम केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार हे गृहीत धरून भाजपने पुण्यात मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. पण, त्याचवेळी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने ओबीसी चेहरा दिला. भाजपने उमेदवार देताना केलेले जातीय समीकरण हे त्यांच्या पथ्यावर पडले.

मताधिक्य झाले कमी

गेल्या निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे सव्वातीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. पण, या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळेस भाजपचे मताधिक्य कमी झाले आहे. त्याने भाजपलाही आत्मचिंतन करावे लागणार आहे.

चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी

कसब्यात धंगेकर यांचा घात

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे १२ हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र, याच कसबा मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांना मताधिक्य दिले आहे. त्यामध्ये भाजपचे हेमंत रासने आणि उद्याेजक पुनीत बालन यांचा मोठा वाटा आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून उद्योजक पुनीत बालन यांनी मोहोळ यांच्यासाठी मोहीम राबविली. त्याचा फायदा मोहोळ यांना झाला आहे. त्यामुळे कसबा या होमपिचवर रवींद्र धंगेकर यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.

वंचित, एमआयएमचा फक्टर चालला नाही

वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना ३१ हजार ९७३ मते मिळाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे अनिल जाधव यांना ६४ हजार ७३४ मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीत ऐवढी ही मते वंचितच्या उमेदवाराला मिळालेली नाही. एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांना केवळ ८५८ मते मिळाली आहेत.

Web Title: Kothrud, Vadgaonsheri, Parbati decided Pune MP; Deprived in Pune, MIM factor missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.