बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:15 AM2024-06-05T10:15:40+5:302024-06-05T10:17:01+5:30

शहरी भागातील हडपसरने कोल्हेंना तर भोसरीने आढळरावांना काहीसे तारल्याचे पाहायला मिळाले....

Shirur Lok Sabha Result 2024 Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil kolhe wins in election | बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे?

बालेकिल्ल्याची अमोल कोल्हेंना साथ तर शिवाजी आढळरावांची पीछेहाट; कोल्हेंना सर्वाधिक मतदान कुठे?

- भानुदास पऱ्हाड
आळंदी (पुणे) :शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव - पाटील यांचा डॉ. कोल्हे यांनी सुमारे १ लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव केला आहे. डॉ.अमोल कोल्हेंच्या विजयामध्ये त्यांचा जन्मस्थान असलेला जुन्नर तालुका अग्रस्थानी राहिला आहे. एकीकडे जुन्नरने सुमारे ५१ हजार ३९३ मतांचे मताधिक्य डॉ. कोल्हे यांना दिले आहे. तर दुसरीकडे बालेकिल्ला असलेल्या आंबेगाव तालुक्यात शिवाजी आढळरावांवर ११ हजार ३६८ मतांनी पिछाडीवर राहण्याची नामुष्की ओढवली. शहरी भागातील हडपसरने कोल्हेंना तर भोसरीने आढळरावांना काहीसे तारल्याचे पाहायला मिळाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात निवडणूक झाली. 'शिरूरमधून अमोल कोल्हें कसे विजयी होतात हेच पाहतो' या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ही निवडणूक राज्यभरात चर्चेत आली. बारामती पाठोपाठ अजित पवारांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवला होता. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप - प्रत्यारोपांमधून त्याची प्रचितीही आली. अखेर डॉ. अमोल कोल्हेंना टपाली मतांसह ६ लाख ९८ हजार ६९२ तर शिवाजीराव आढळराव पाटलांना ५ लाख ५७ हजार ७४१ मते मिळाली. परिणामी आढळरावांच्या पाठीशी पाच विद्यमान आमदारांचा ताफा असतानाही डॉ. अमोल कोल्हेंची १ लाख ४० हजार ९५१ मतांनी सरशी झाली.

कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

जुन्नर तालुक्याने डॉ. अमोल कोल्हेंना ५१ हजार ३९३ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवून दिले आहे. तर खेड आळंदी विधानसभा मतदार संघाने दुसऱ्या क्रमांकाचे ४६ हजार २६३ मतांचे मताधिक्य मिळवून देत कोल्हेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. शिरूर तालुक्याने कोल्हेंना २७ हजार ७८९ मतांचे तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य दिले. शहरी भागातील हडपसर १३ हजार ३८९ मतांचे लीड देत चौथ्या क्रमांकावर राहिला. तर आंबेगाव तालुक्यानेही डॉ. कोल्हेंना ११ हजार ३६८ मतांचे मताधिक्य देत कोल्हेंना पसंती दिली. शिवाजीराव आढळराव पाटलांना फक्त भोसरी विधानसभा मतदारसंघातून ९ हजार ५७२ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. 

'नोटा'ला साडेनऊ हजार मते...

शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. विशेष म्हणजे या निवडणुकीत ‘वरीलपैकी कोणीही नाही’ म्हणजेच नोटा हा पर्याय ९ हजार ६६१ मतदारांनी निवडला. मतमोजणीच्या पोस्टल वगळता झालेल्या एकूण २७ फेऱ्यांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हेंना पहिल्या व शिवाजी आढळरावांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकाची मनोहर वाडेकर यांना २८ हजार ३३० मते प्राप्त झाली. तर १७ हजार ४६२ मते घेत डॉ. अन्वर शेख चौथ्या क्रमांकावर राहिले. 

चुरशीची वाटणारी लढाई झाली एकतर्फी; सुप्रिया सुळेंना दीड लाखाचे मताधिक्य, चौथ्यांदा विजयी

तालुकानिहाय प्रथम दोघांना झालेले मतदान:

तालुका      डॉ. अमोल कोल्हे     शिवाजीराव आढळराव

खेड         १,१६,५४९                 ७०,२८६
आंबेगाव    ९३,३८७                   ८२,०१९
हडपसर     १,३३,८१८               १,२०,४२९ 
भोसरी       १,१७,८२३               १,२७,३९५
जुन्नर         १,०८,११९               ५६,७२६
शिरूर        १,२८,०७२              १,००,२८३
टपाली          ९२४                       ६०३

एकूण         ६,९८,६९२              ५,५७,७४१

Web Title: Shirur Lok Sabha Result 2024 Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil kolhe wins in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.