Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 03:51 PM2024-05-18T15:51:08+5:302024-05-18T15:52:05+5:30

सांस्कृतिक कार्यक्रमांचा सदाशिव पेठ, पुणे ३० मधील केंद्रबिंदू कधीचाच कोथरूडमध्ये येऊन स्थिरावला

Kothrud citizens to Pune heavily BJP centerpiece of city politics | Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

राजू इनामदार 

पुणे : कोथरूड आता पुण्याची सांस्कृतिक राजधानी होऊ पाहत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचा सदाशिव पेठ, पुणे ३० मधील केंद्रबिंदू कधीचाच कोथरूडमध्ये येऊन स्थिरावला आहे. असे स्थलांतरित होताना बहुधा लोक तिथला कट्टरपणा तिथेच ठेवून आले असावेत. म्हणूनच कोथरूड आता सर्वसमावेशक झाले आहे.

जुने कोथरूड गाव व नवे, बाहेरून आलेल्यांचे मॉड कोथरूड असे दोन्हीही इथे सुखनैव नांदतात. गावची जत्रा भरते तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात समांतर रंगभूमीचे प्रयोगही रंगतात. हेच वैविध्य कोथरूडकरांनी राजकारणातही दाखवले आहे. स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाल्यावर त्यांनी चंद्रकात मोकाटे या भूमिपुत्राला संधी दिली. त्यानंतर मेधा कुलकर्णी या सुशिक्षित विद्वान महिलेचीही निवड केली. सदाशिव पेठेतून नाही, तर थेट कोल्हापुरातून आलेले चंद्रकांत पाटील हेदेखील कोथरूडकरांना चालले. त्यामुळेच कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना भाजपने कोथरूडमधून उमेदवारी दिली; त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या या धारिष्ट्याचे तमाम पुणेकरांना आश्चर्य वाटले; पण कोथरूडकरांना नाही.

खरे तर भाजप कार्यकर्त्यांनाही ही गोष्ट आवडली नव्हती; पण ते बोलू शकत नव्हते. विरोधी पक्ष बोलू शकत होते. ते सगळे एकत्र आले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना उभे केले; पण उपयोग झाला नाही. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे ८० हजार मते मिळाली, पण कोथरूडकरांच्या भरघोस पाठिंब्यावर पाटीलच निवडून आले. राज्यातील भाजपची सत्ता गेली, त्यांचे मंत्रिपद गेले, पुढे शिवसेना फुटून पुन्हा भाजपची सत्ता आली. पाटील पुन्हा मंत्री झाले. पण ते कोथरूडकर झालेत का?

भाजपबरोबर मित्रपक्षही दावेदार 

- विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा स्थलांतरित की भूमिपूत्र हा प्रश्न उभा राहणार आहे. अर्थात ते भाजपचे उमेदवार असतीलच. मागील निवडणुकीतच त्यांनी कोथरूडात त्यांचे घरही केले आहे. लोकसभेच्या निकालानंतर या मतदारसंघात दोन खासदारांच्या मताला अतिशय महत्व येणार आहे. पहिल्या म्हणजे डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यसभेच्या सदस्यपदी त्यांनी नियुक्ती करून भाजपने कोथरूडकरांचे मन राखले. दुसरे म्हणजे मुरलीधर मोहोळ. निवडून आले तर त्यांनाही विचारल्याशिवाय उमेदवार निश्चित करता येणार नाही.
- चंद्रकांत पाटील उमेदवार असतील तर काही प्रश्नच नाही, पण पक्षाने त्यांना थांबवले तर मात्र भाजपतून या मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी जत्राच भरेल अशी स्थिती आहे. महायुतीच्या जागावाटपात कदाचित या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसही (अजित पवार) दावा करू शकते किंवा त्यांचा स्वतंत्र लढण्याचा निर्णयही होऊ शकतो. तशी तयारी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी ठेवलेली आहे. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच. त्यांना तर इथला अनुभव आहे.

महाविकास आघाडीची तयारी

दुसरीकडे, महाविकास आघाडीतही या जागेवरून चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) दावा प्रबळ आहे. इथलेच माजी आमदार असलेले चंद्रकांत मोकाटे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याशिवाय पृथ्वीराज सुतार यांनाही वडील शशिकांत सुतार यांची सुभेदारी परत आणायची आहे. काँग्रेसलाही इथून शक्यता वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना इथे फारसा वाव आणि रसही दिसत नाही. आघाडीतील आम आदमी पार्टी तसेच अन्य पक्षांनाही कोथरूड लढवण्याची फारशी इच्छा दिसत नाही. असली असती तर ते त्या दिशेने प्रयत्न करताना दिसले असते. आज तरी त्यांच्यापैकी कोणी तशी मोर्चेबांधणी वगैरे करताना दिसत नाही. आघाडीत जागावाटपावरून मतभेद होऊ शकतात. त्यातून कोणी बाहेर पडले तर मग स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहेच.

केंद्रबिंदू होणार कोथरूड

राजकारणात कोथरूडकर पुण्याला भारीच पडले आहेत. राज्यातील मोठ्या मंत्रिपदाचा अनुभव त्यांना युती सरकारमध्ये सन १९९५ मध्ये मिळाला, मात्र तो अल्पकाळच होता. आता पुन्हा त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे. काही काळ पालकमंत्रिपदही होते. मोहोळ निवडून आले तर कोथरूडकरांना दोन खासदार मिळतील. एक राज्यसभेचे, तर दुसरे लोकसभेचे. भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू त्यामुळे कोथरूड झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा

एकूण मतदान : ४,१४,७५५
प्रत्यक्षात झालेले मतदान : २,१७,४५५
मतदानाची टक्केवारी : ५२.४३ टक्के.

Web Title: Kothrud citizens to Pune heavily BJP centerpiece of city politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.