वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

By नितीन चौधरी | Published: May 6, 2024 04:15 PM2024-05-06T16:15:57+5:302024-05-06T16:16:17+5:30

मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा

If there is no voting card, one of the 12 identity cards will be accepted, Collector Dr. Suhas Diwase's information | वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

पुणे : मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मंगळवारी (दि. ७) बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ही आहेत ती १२ ओळखपत्रे

१. पारपत्र (पासपोर्ट)
२. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
३. केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
४. बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
५. पॅन कार्ड
६. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
७. मनरेगा अंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
८. निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
९. संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
१०. आधार कार्ड
११. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
१२. कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

मतदार चिठ्ठी ठेवा सोबत

प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण करण्यात येत आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्र सोबत न्यावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आपल्या मतदान केंद्राविषयी जाणून घ्या

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा आणि खडकवासला मतदारसंघाचा समावेश होतो. लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता नागरिकांनी मतदानापूर्वी आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी. जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यादृष्टीने मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र स्थापित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ॲपद्वारेही ही माहिती मिळू शकेल. मतदारांना वितरीत करण्यात येणाऱ्या मतदार माहिती चिठ्ठीद्वारेदेखील कुठे मतदान करावयाचे आहे ते कळू शकेल. मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन दिवसे यांनी केले आहे.

Web Title: If there is no voting card, one of the 12 identity cards will be accepted, Collector Dr. Suhas Diwase's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.