भोर तालुक्यातील घटना; डोंगरावरून दरड कोसळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:17 IST2021-07-23T18:11:19+5:302021-07-23T18:17:17+5:30
जवळपास ३०० फुटांवरून दगडमाती खाली आल्याने भोर पांगारी धारमंडप मार्गे महाडरोडला येणारा रस्ताही बंद झाला आहे.

भोर तालुक्यातील घटना; डोंगरावरून दरड कोसळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
भोर : भोर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सांळुगण येथील डोंगरावरील दरड कोसळल्याची घटना घडली आहे. जवळपास ३०० फुटांवरून दगडमाती खाली आल्याने भोर पांगारी धारमंडप मार्गे महाडरोडला येणारा रस्ताही बंद झाला आहे.
मागील दोन तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे साळुंगण गावातील डोगरावरुन आलेल्या पाण्यामुळे सुमारे ३०० फुटावरुन दगड, माती, झाडे दरड खाली आली आहेत. यामुळे साळुंगण, राजिवडी, कुंड, आशिंपी उंबार्डे या गावांचा महाड व साळुंगण दोन्ही बाजूकडून रस्ताच बंद झाल्याने संपर्क तुटलेला आहे.
सांळुगण गावात दोन ठिकाणी दरड पडून शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. भात हे प्रमुख पिक असुन उत्पन्नाचे साधन आहे. माञ पावसाने मोठे नुकसान झाल्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांची उपासमार होणार आहे. साळुंगण गावात भुस्कलन होऊन डोंगरातील दगडमाती खाली येऊन स्मशानभूमी गाडली. भातशेती पाण्यात गेली तर रस्ताही बंद झाला आहे. सदर नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य विठठल आवाळे यांनी सांगितले.