नदीपात्रात पाण्याची मोटार सोडताना विजेच्या धक्क्याने ४ शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:47 IST2022-12-15T14:47:03+5:302022-12-15T14:47:20+5:30
राजगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू

नदीपात्रात पाण्याची मोटार सोडताना विजेच्या धक्क्याने ४ शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
नसरापूर : भोर तालुक्यातील निगडे या गावामध्ये नदीपात्रात पाण्याची मोटार सोडत असताना विजेचा धक्का लागून एकाच गावातील चार शेतकरी घटनास्थळी मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत बापलेकांचा समावेश आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या दुर्दैवी घटनेत निगडे येथील विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४८वर्षे), सनी विठ्ठल मालुसरे(वय २४ वर्षे), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३५ वर्षे), आनंदा ज्ञानोबा जाधव (वय ५८ वर्षे) (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असून चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी ग्रामस्थ, महसूल, महावितरण, राजगड पोलीस दाखल झाले आहेत. आमदार संग्राम थोपटे, पोपटराव सुके, कुलदीप कोंडे, जीवन कोंडे आदी नेतेगण यावेळी घटना स्थळी उपस्थित होते.
निगडे ( ता. भोर) येथील गुंजवणी नदीपात्रातील लगत असणाऱ्या शेतासाठी पाणी लागत होते. विज पुरवठा खंडीत असताना घटनेतील चारही जणांनी अवजड असलेला पाणी ओढण्याचा शेती पंप पाण्यात सोडत होते. तेव्हा खंडीत वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याने विजेच्या धक्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने निगडे गावावर दुःखाचा डोंगर उभा राहीला आहे. सदर घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. राजगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.