पुणे भाजपमध्ये पहिली बंडखोरी? माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला, पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:49 IST2025-12-29T16:49:21+5:302025-12-29T16:49:46+5:30
विशेष म्हणजे, धनंजय जाधव हे भारतीय जनता पक्षचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती–नवी पेठ या प्रभागात इच्छुक होते

पुणे भाजपमध्ये पहिली बंडखोरी? माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला, पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा
पुणे : पुण्यात भाजपने १०० जागा निश्चित केल्या असून एक यादी तयार केली आहे. आता त्याच यादीतील ८० उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यादी जाहीर न करता भाजपने थेट ८० जणांना एबी फॉर्म दिले आहेत. गणेश बिडकर यांनी शहरातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील अधिकृत भाजप उमेदवार म्हणून बिडकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आता इतरही उमेदवार अर्ज दाखल करण्यास असुरुवात झाली आहे. अशातच भाजपमधून पहिली बंडखोरी समोर आली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळालं नसल्याने नाराज झालेल्या एका माजी नगरसेवकांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय गाठलं. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. धनंजय जाधव हे प्रभाग क्रमांक २७ मधून इच्छुक होते. मात्र पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या जाधव यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. विशेष म्हणजे, जाधव हे भारतीय जनता पक्षचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती–नवी पेठ या प्रभागात इच्छुक होते, अशीही चर्चा आहे.
पुण्यात भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याने पक्षाने थेट एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत भाजपने पहिली यादी जाहीर केली. मात्र पुण्यात यादी न जाहीर करता थेट एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपने ही शक्कल लढवली आहे. असे करूनही पहिलीच बंडखोरी भाजपमधून झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आज उद्या बंडखोरी रोखण्याचे पक्षासमोर आव्हानच असणार आहे.