Chandni Chowk:अखेर मुहूर्त मिळाला! चांदणी चौकातील मार्गाचे लोकार्पण १२ ऑगस्टला होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 10:33 IST2023-08-11T10:33:05+5:302023-08-11T10:33:32+5:30
मुख्यमंत्र्यांना चांदणी चौकातील कोंडीचा अनुभव आल्यानंतर या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले

Chandni Chowk:अखेर मुहूर्त मिळाला! चांदणी चौकातील मार्गाचे लोकार्पण १२ ऑगस्टला होणार
पुणे : भूसंपादनासह अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शनिवारी (१२ ऑगस्ट) केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार असून, यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी या कामाला १ मे आणि १५ जुलै असा मुहूर्त मिळाला होता. या चौकातील कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, काही काम झाल्यानंतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळे आले. त्यामुळे हे काम रखडले. त्यानंतर या चौकात सातत्याने वाहतूककोंडीची समस्या होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही येथील कोंडीत अडकावे लागले होते. मुख्यमंत्र्यांना कोंडीचा अनुभव आल्यानंतर मात्र या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले होते. त्यानंतर भूसंपादनासह या चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावरदेखील यशस्वीपणे मात करीत हे काम आता पूर्ण झाले आहे.
पालिकेला भूसंपादनासाठी सुमारे ४०० कोटी तसेच प्रत्यक्षात उड्डाणपूल उभारण्यासह अन्य रस्त्यांची कामे करण्यासाठी ४६० कोटी असा सुमारे ८६० कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी आला आहे. गडकरी यांनी यापूर्वी याचे उद्घाटन १ मे रोजी होईल, असे जाहीर केले होते. मात्र, तो मुहूर्त हुकल्यानंतर १५ जुलै हा दिवस जाहीर केला. आता या पुलाचे उद्घाटन उद्या होणार आहे.