मंडपाचे खड्डे स्वखर्चाने बुजवा, ३ दिवसांत अतिक्रमणे काढा; पुणे महापालिकेची मंडळांसाठी नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:45 IST2025-08-05T10:38:31+5:302025-08-05T10:45:37+5:30
नागरिकांना वाहतूक करताना अडथळा हाेणार नाही, ध्वनी प्रदूषणाचा त्रास हाेणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मंडपाचे खड्डे स्वखर्चाने बुजवा, ३ दिवसांत अतिक्रमणे काढा; पुणे महापालिकेची मंडळांसाठी नियमावली
पुणे: महापालिकेने काही दिवसांवर आलेल्या गणेशाेत्सव आणि नवरात्राेत्सवासाठी नियमावली केली असून, उत्सव मंडपासाठी घेतलेले खड्डे स्वखर्चाने बुजवावेत, उत्सवानंतर तीन दिवसांत मंडप, सजावट काढून जागा माेकळी करावी आदी नियमांचा यात समावेश आहे. महापालिकेकडून सार्वजनिक गणेश व नवरात्रोत्सवाचा मंडप, रनिंग मंडप व स्वागत कमानींसाठी दरवर्षी परवानगी दिली जाते. मात्र, २०२२ पासून पाच वर्षांसाठी एकदाच हे परवाने देण्यात आले आहेत. नवीन गणेश मंडळांना मात्र २०१९ च्या नियमावलीनुसार परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच विविध परवानगी घेण्यासंदर्भात पुणे पाेलिस, महापालिका एक खिडकी याेजना सुरु करणार आहे.
या उत्सवासाठी महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, मंडपाची उंची चाळीस फुटांपेक्षा जास्त असू नये, त्यापेक्षा अधिक उंच मंडप असेल तर स्थापत्य अभियंत्याकडून त्या मंडपाचा स्थिरता अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. कमानींची उंची ही अठरा फुटांपेक्षा अधिक असावी, त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाय म्हणून स्वयंसेवक किंवा सुरक्षारक्षक नियुक्त करावेत तसेच ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात शासकीय नियमांचे पालन करावे, अशा विविध सूचनांचा समावेश आहे.
उत्सव संपल्यानंतर मंडळांनी सजावटीचे साहित्य, मंंडप आदी अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत. तसेच मंडपासाठी खाेदलेले खड्डे सिमेंट काँक्रीटने दुरुस्त करणे बंधनकारक असल्याचे यात नमूद केले आहे. नागरिकांना वाहतूक करताना अडथळा हाेणार नाही, ध्वनी प्रदूषणाचा त्रास हाेणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : http://complaint.punecorporation.org, टाेल फ्री क्रमांक : १८०० १०३ ०२२२, माेबाईल ॲॅप : PUNE Connect, व्हाॅट्सॲप क्रमांक : ९६८९९००००२ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.