‘मोफत’ची घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी उडवली अजितदादांच्या घोषणेची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:37 IST2026-01-12T12:37:03+5:302026-01-12T12:37:48+5:30
मी देखील ‘पुण्यातून महिलांना मोफत विमान प्रवास करता येईल’ अशी घोषणा करणार होतो. ‘घोषणाच करायचीय, मग काहीही आश्वासन देतो. पण, ते पटलं पाहिजे ना!

‘मोफत’ची घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी उडवली अजितदादांच्या घोषणेची खिल्ली
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी ‘मोफत मेट्रो प्रवास’ अशी घोषणा करायला काय जातंय. मीदेखील ‘पुण्यातून महिलांना मोफत विमान प्रवास करता येईल’ अशी घोषणा करणार होतो. ‘घोषणाच करायचीय, मग काहीही आश्वासन देतो. पण, ते पटलं पाहिजे ना, नागरिकांचा विश्वास बसेल अशी घोषणा तरी करायची, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. मेट्रो ही केवळ राज्याची नसून केंद्राचीही योजना आहे, मेट्रोचे तिकीट दर ठरविण्याचे अधिकार तिकीट समन्वय समितीकडे असतात. पुणेकरांना मोफत सेवा नको, तर दर्जेदार आणि उत्तम सेवा हवी असून त्यासाठी योग्य शुल्क देण्याची तयारी आहे. हे आश्वासन पुणेकरांना समजलं आहे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या मोफत मेट्रो प्रवास घोषणेची खिल्ली उडवली.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी आयोजित 'संवाद पुणेकरांशी' या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राजेश पांडे, धीरज घाटे यावेळी उपस्थित होते.
अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पाणी, पर्यावरण, हवामान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नदी सुधारण योजना, मेट्रो आणि पीएमपीची भविष्यातील वाटचाल आणि पुण्यात होणाऱ्या पायाभूत सुविधांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. माझे काम बोलते असे सांगून फडणवीस म्हणाले,‘महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असून राज्यातील सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीबरोबर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे जाहीर केले होते. निवडणुकांमध्ये मी संयम पाळला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संयम ढळला आहे. कदाचित १५ जानेवारीनंतर ते बोलणार नाहीत, असा टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला. टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत तर तेथील अतिक्रमणे हटवून पुनर्वसन केले जाईल. 'बीडीपी' झोनमध्ये धोरण नसल्याने ३० टक्के अतिक्रमणे झाली आहेत. तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, डोंगर आणि जैवविविधता १०० टक्के वाचवूनच पुण्याचा शाश्वत विकास केला जाईल. पुण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पुण्यासाठी नवीन पाण्याचा स्रोत निर्माण करावा लागणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
२८० बिलियन डॉलर्सचे पुणे ग्रोथ हब हेच आमचे व्हिजन
राज्याच्या ५८० बिलियन डॉलर जीडीपीमध्ये पुण्याचा वाटा ७८ बिलियन आहे, तो २८० बिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी आम्ही 'पुणे ग्रोथ हब' ही संकल्पना राबवत आहोत. पुण्याचा विस्तार, संधी आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसराचा एकात्मिक विकास केला जाईल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुन्हेगारी संपविण्याची भाषा करणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिलीत
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली आहेत. आता आमच्या सहकारी पक्षाचे उमेदवार असल्याचे सांगत आहेत. गुन्हेगारी संपली पाहिजे असे म्हणायचे आणि त्यांना उमेदवारी द्यायची. गुन्हेगारांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देणे पुणेकरांना रुचणारे नाही. गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल. मी गृहमंत्री म्हणून पुण्याची गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सरकारमध्ये अजित पवारच ‘दादा’
भाजपपक्षामध्ये चंद्रकांत पाटील हे दादा आहेत. तर राज्यसरकारमध्ये अजित पवार हेच दादा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका रॅपिड प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दोन भाऊ आणि बहीण भाऊ एकत्र
दोन भाऊ आणि बहीण भाऊ एकत्र आले या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले , दोन भाऊ एकत्र येण्याचे क्रेडिट मला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कुटुंब एकत्र येत असतील तर ही चांगली बाब आहे. बहिण भाऊ एकत्र आले की नाही हे नंतरच कळेल.