Pune Metro: शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे पाहण्याऱ्या भाविकांची सोय होणार; कसबा मेट्रो स्थानकाचे २ प्रवेशद्वार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 20:33 IST2025-08-29T20:33:12+5:302025-08-29T20:33:28+5:30
शहराच्या मध्यवस्तीमध्ये गणपती व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांनी कसबा मेट्रो स्थानकावर उतरावे. तेथून गणपती पाहून परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्थानकावरून करावा - मेट्रोचे आवाहन

Pune Metro: शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे पाहण्याऱ्या भाविकांची सोय होणार; कसबा मेट्रो स्थानकाचे २ प्रवेशद्वार सुरू
पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट मेट्रो मार्गावरील कसबा मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक दोन शुक्रवारी प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात हे प्रवेशद्वार सुरू झाल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोय होणार आहे. या प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रवेशद्वार साततोटी पोलीस चौकीच्या जागेवर उभारण्यात आले आहे.
प्रवेशद्वार क्रमांक दोन हे मुख्य रस्त्यावर असून यामुळे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, भाई आळी आणि भीम नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे. या प्रवेशद्वारापासून महानगरपालिकेचे मुख्य रुग्णालयांपैकी एक असणारे कमला नेहरू रुग्णालय हे खूप जवळ आहे. या प्रवेशद्वारामुळे प्रवाशांना मुख्य रस्त्यापासून मेट्रो स्थानकात जाणे अतिशय सोपे होणार आहे. याचबरोबर येरवडा मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक दोन व प्रवेशद्वार क्रमांक तीन येथील एस्किलेटर (सरकता जिना) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे.
कसबा मेट्रो स्थानकावर उतरा
शहराच्या मध्यवस्तीमध्ये गणपती व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांनी कसबा मेट्रो स्थानकावर उतरावे. तेथून गणपती पाहून परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्थानकावरून करावा. तसेच, वनाझ ते रामवाडी मार्गावरील प्रवाशांनी पीएमपी स्थानकाचा वापर करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आला आहे.