एकनाथ शिंदेंनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, अजित पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:11 IST2026-01-13T15:10:57+5:302026-01-13T15:11:26+5:30
“घड्याळाची टिक-टिक कधीही बंद पडू शकते. त्यामुळे अजित पवार सध्या अलाराम वाजवत फिरत आहेत”

एकनाथ शिंदेंनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, अजित पवारांना टोला
पुणेः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत असताना ‘लाडकी बहीण’ योजना राबवता आली नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून ही योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे सुरू केली. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचे सर्व श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जाते, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले.
“घड्याळाची टिक-टिक कधीही बंद पडू शकते. त्यामुळे अजित पवार सध्या अलाराम वाजवत फिरत आहेत,” अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, प्रदीप रावते आणि हेमलता बनसोडे यांच्या प्रचारार्थ धानोरी येथील भैरवनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
गोगावले म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक लोकहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय घेण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करत आहेत. मात्र मध्यप्रदेशातील योजनेचा सखोल अभ्यास करून, संपूर्ण माहिती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही योजना महाराष्ट्रात आणली, हे सर्वांना माहीत आहे.”
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “आमचा धनुष्यबाण ताणला तर तो सुसाट जाईल. त्यामुळेच यावेळी शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे.”
प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेनेचे सर्व उमेदवार सक्षम, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी असलेले असून परिसरातील कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. “कोकणी समाज हा कुणाच्याही मक्तेदारीचा नाही. तो शिवसेनेचाच पारंपरिक मतदार असून, यावेळीही तो शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील,” असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी गिरीश जैवळ यांनी धडाकेबाज भाषण करत चारही उमेदवार प्रस्थापितांना शह देत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. या जाहीर सभेला सर्व उमेदवारांसह सतीश म्हस्के, विवेक बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.