भाजपच्या योजना फसव्या तर काँग्रेसच्याच खऱ्या; कर्नाटकचे उर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:27 IST2024-11-12T16:27:13+5:302024-11-12T16:27:38+5:30
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने दिलेली गॅरंटी पूर्ण केली, त्याप्रमाणेच राज्यात महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसुत्री यशस्वी होईल

भाजपच्या योजना फसव्या तर काँग्रेसच्याच खऱ्या; कर्नाटकचे उर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांचा दावा
पुणे: भाजपने जाहीर केलेल्या सगळ्या योजना फसव्या व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत. कर्नाटकमध्येकाँग्रेसच्या सरकारने दिलेली गॅरंटी पूर्ण केली, त्याप्रमाणेच राज्यात महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसुत्री यशस्वी होईल असा दावा कर्नाटकचे उर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी केला. भाजपच विकास करू शकते हा गैरसमज असल्याची टीका त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक जॉर्ज यांनी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहमंद, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यावेळी उपस्थित होते. जॉर्ज म्हणाले, “कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने गृह लक्ष्मी, शक्ती, गृह ज्योती, अन्न भाग्य आणि युवा निधी अशा ५ योजनांची गॅरंटी दिली होती. सत्ता आल्यावर या योजना मागील २ वर्षांपासून सुरू आहेत. त्याअतंर्गत लाभार्थी कुटुंबाला दरमहा सरासरी ४ ते ५ हजार रूपयांचा लाभ मिळतो. या योजनेनंतर भाजपने कर्नाटक राज्य दिवाळखोर होईल अशी टीका केली, मात्र आम्ही योजनांबरोबरच राज्याचा आर्थिक विकास साधत कामेही केली आहेत.”