भाजपने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा शरद पवार गटावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:33 PM2024-04-29T16:33:16+5:302024-04-29T16:34:02+5:30

सांगवी (ता. बारामती) येथे रविवार ( दि. २८) रोजी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बोलत होते....

An attempt to take credit for the work done by the BJP; Ajit Pawar accuses Sharad Pawar group | भाजपने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा शरद पवार गटावर आरोप

भाजपने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा शरद पवार गटावर आरोप

सांगवी (पुणे) :बारामतीचा भाग दुष्काळी आसतानादेखील नीरा डाव्या कालव्याला पाणी आले. यामुळे शेतकऱ्यांनी मतदान करताना कोणामुळे पाणी आले, कोणत्या सरकारने पाणी दिले हे विसरू नये. पालखी महामार्ग व फलटण-बारामती रस्ता भाजपने केला. पण, श्रेय मात्र शरद पवार गट लाटत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

सांगवी (ता. बारामती) येथे रविवार ( दि. २८) रोजी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, १९७८ साली दोन्ही काँग्रेसचे सरकार चांगले चालले होते. यशवंतराव चव्हाणांचा विरोध आसतानादेखील शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडले. त्यांना ही भूमिका आवडली नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले. मग मी काय गद्दारी केली? साठीच्या वर माझे वय झाले तरी मी सगळे ऐकत आलो. वय झाल्यावर तरुणांच्या हातात कारभार दिला जातो; पण तसे झाले नाही.

या अगोदरही पवार कुटुंबात फूट

अजित पवार म्हणाले की, त्यावेळी आमच्या कुटुंबात वसंत पवारांसह संपूर्ण कुटुंब शेतकरी कामगार पक्षात होते. पवार साहेब काँग्रेसचे काम करायचे. परंतु, सर्वांनी ते मान्य केले. त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय फुटीच्या घटना नवीन नसल्याचे सांगत अजित पवारांनी कुटुंबातील जुना राजकीय प्रसंग समोर मांडला. त्यामुळे आता शरद पवार यांच्यापासून अजित पवार वेगळे झाल्यानंतर कुटुंबात झालेल्या दुफळीबाबत अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांना खोडत प्रश्न उपस्थित केला. पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना करेपर्यंत निवडणुकीची मिळालेली एकूण सहा चिन्हेदेखील अजित पवार सांगायला विसरले नाहीत. पवार कुटुंबाच्या उभ्या फुटीनंतर सध्याच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मिळालेले सातवे चिन्ह तुतारी सांगायच्या अगोदरच ते चिन्ह विसरून जा, असे मिश्कील भाषेत सांगताच सभेत एकच हशा पिकला.

माळेगाव कारखान्याचा २५ हजार कोटींचा कर माफ

माळेगाव कारखान्याला १० हजार कोटींचा कर व १५ हजार कोटींचे व्याज लागले होते. अमित शाह यांनी संपूर्ण टॅक्स व व्याज माफ केले. माळेगावने उसाला एफआरपीपेक्षा जास्त दर दिला. भाजप सरकार चांगले निर्णय घेत असून, मोदींची प्रशासनावर चांगली पकड आहे. आपला फायदा होत आहे. त्यामुळे मी भाजपसोबत गेलो असल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

बारामतीच्या सर्व सुनांनी आता घड्याळासमोरील बटण दाबून सून बाहेरची असते का घरची हे दाखवून द्या, अशी टिप्पणी अजित पवारांनी केली आहे. यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, विश्वास देवकाते, रंजन तावरे, अनिल तावरे, किरण तावरे, मीनाक्षी तावरे, करण खलाटे यांच्यासह महायुती मित्रपक्षांतील पदाधिकारी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: An attempt to take credit for the work done by the BJP; Ajit Pawar accuses Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.