शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 18:46 IST2024-05-05T18:42:50+5:302024-05-05T18:46:08+5:30
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत आज सांगता सभा पार पडली.

शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
Sharad Pawar Baramati Rally ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या मतदानापूर्वी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहायलं जात आहे. कारण या मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत आज सांगता सभा पार पडली. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी जाहीर सभा संपन्न झाली. मात्र सुप्रिया सुळे यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत अचानक अजित पवार स्क्रीनवर आले आणि काही वेळासाठी सर्वजणच स्तब्ध झाले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जे अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी परिश्रम करत होते ते यंदाच्या निवडणुकीत मात्र सुळे यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या सभेत अजित पवारांचा जुना व्हिडिओ दाखवण्यात आला. रोहित पवार यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना म्हटलं की, 'आता आम्ही एका व्यक्तीचा संदेश दाखवणार आहोत, त्या व्यक्तीचे कोणी समर्थक इथे असतील तर त्यांनी ऐकावं की ही व्यक्ती आधी काय बोलली होती.' त्यानंतर अजित पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारा जुना व्हिडिओ दाखवण्यात आला.
या व्हिडिओमधील भाषणात अजित पवार यांनी म्हटलं होतं की, "बारामतीचे आतापर्यंत जे कोणी खासदार झाले, मग त्यामध्ये साहेब असतील, संभाजीराव काकडे, मी स्वत: असेल, आतापर्यंतच्या या खासदारांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक जनसंपर्क कोणी ठेवला असेल तर तो सुप्रिया सुळे यांनी ठेवला आहे."
दरम्यान, अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा आधार घेत आजच्या सभेत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्र्वादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.