अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:13 PM2024-04-13T18:13:15+5:302024-04-13T18:16:05+5:30

Baramati Lok Sabha: धाडस करून तुम्ही नाव घेऊन आरोप करा, असं रोहित पवारांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे.

Ajit pawar should dare to say the name then he will get the answer Rohit Pawars challenge | अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

Rohit Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने कुटुंबातील राजकीय संघर्ष टोकदार झाला असून एकमेकांवर जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मी तोंड उघडलं तर तुम्हाला लोकांमध्ये फिरणं अवघड होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावंडांना दिल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना प्रतिआव्हान दिलं आहे. धाडस करून तुम्ही नाव घेऊन आरोप करा, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना रोहित पवार म्हणाले की, "बारामती मतदारसंघात दडपशाही आणि दबाव असतानाही कार्यकर्ते आणि लोक आमच्यासोबत येत आहेत, यावरून तुम्ही कसा प्रतिसाद आहे, याचा अंदाज लावू शकता. अजितदादांच्या निवडणुकीत भावंडंही फिरली आहेत. अगदी बहिणींनीही अजितदादांचा प्रचार केला आहे, हे आपल्याला लोकंच सांगतील. कोणत्या भावंडांबाबत त्यांचा आक्षेप आहे, नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अजितदादांनी धाडस दाखवून नाव घेऊन सांगावं. त्यानंतर ती भावंडंच त्यांना उत्तर देतील," असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे.

दरम्यान, आता रोहित पवार यांनी डिवचल्यानंतर अजित पवारही त्यांनी केलेल्या आरोपावर सविस्तर भाष्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या भावंडांचा अजित पवारांनी कसा घेतला समाचार?

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील विविध सदस्य मैदानात उतरले आहेत. यावरून निशाणा साधताना अजित पवारांनी म्हटलं होतं की, "माझी भावंड माझ्या निवडणुकीला कधी कुठे फिरली नाहीत, पण आता मात्र गरागरा फिरत आहेत. अरे तुमचा भाऊ उभा होता, तेव्हा नाही वाटलं का रे फिरावं? पण हे सगळं औटघटकेचं आहे. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात, तशा या छत्र्या उगवल्या आहेत. मी तोलून-मापून बोलतोय म्हणून ते काहीही बोलायला लागले आहेत. मी जर तोंड उघडलं तर यातील अनेकांना लोकांमध्ये फिरता येणार नाही, तोंड दाखवायला जागा राहणार नाही," असा आक्रमक इशारा अजित पवारांनी दिला होता.

दरम्यान, "निवडणूक झाली की हे लोक जातील परदेशात फिरायला. कारण त्यातील बऱ्याच जणांना परदेशातच जायला आवडतं. निवडणुकीनंतर त्यातील कोणंच तुमच्या कामाला येणार नाही. तुमच्या कामाला मीच येणार आहे," असंही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते.

Web Title: Ajit pawar should dare to say the name then he will get the answer Rohit Pawars challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.