तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:29 IST2024-04-11T15:27:15+5:302024-04-11T15:29:54+5:30
Baramati Lok Sabha: बारामतीतील मेळाव्यात केलेल्या आरोपांविषयी आज पुणे येथे पत्रकारांनी सविस्तर माहितीची विचारणा करताच अजित पवार काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं.

तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!
Ajit Pawar ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बारामती शहरात नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांविषयी आज पुणे येथे पत्रकारांनी सविस्तर माहितीसाठी विचारणा करताच अजित पवार काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं.
बारामतीच्या सभेत खळबळजनक गौप्यस्फोट करत अजित पवार म्हणाले होते की, "लोकसभेची उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून विजय शिवतारे यांना आलेले फोन त्यांनी मला दाखवले. ते फोन नंबर बघून मला इतकं वाईट वाटलं की कोणत्या पातळीवर राजकारण सुरू आहे. त्यांनी ते फोन नंबर मला दाखवले, एकनाथ शिंदेंना दाखवले आणि देवेंद्र फडणवीसांनाही दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, बाकी काही बघितलं नाही, त्यांच्याकडून माझ्या बाबतीत असं राजकारण सुरू आहे," असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यामुळे हे फोन नंबर नक्की कोणाचे होते, याबाबतचा प्रश्न आज पुण्यात अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाने अजित पवारांचा पारा चांगलाच चढला आणि ते म्हणाले की, "तुम्ही मला मूर्ख समजू नका. मला जेवढं बोलायचं आहे, तेवढं मी सांगितलं आहे. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं आहे, तेवढं मी बोललो आहे."
दरम्यान, अजित पवार यांनी विजय शिवतारेंना आलेल्या कथित फोन कॉल्सबद्दल गंभीर आरोप केले असले तरी ते फोन नक्की कुणाचे होते, हे सांगणं का टाळलं, याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे.
सुप्रिया सुळेंनी काय प्रत्युत्तर दिलं?
अजित पवारांनी विजय शिवतारेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचा रोख सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी याबाबत नुकतंच स्पष्टीकरण दिलं होतं. "मला याची माहिती नाही. पण ते फोन करणारे कोण नेते आहेत, ते जाणून घ्यायला मलाही आवडेल," असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.