आमदार बापू पठारेंना मारहाण करणाऱ्या बंडू खांदवे सह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:34 IST2025-10-06T17:33:48+5:302025-10-06T17:34:19+5:30
एका कार्यक्रमात आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले होते

आमदार बापू पठारेंना मारहाण करणाऱ्या बंडू खांदवे सह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल
पुणे : माजी सैनिकांच्या आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून आमदार बापू पठारे यांच्यासह चालकावर झालेल्या मारहाणीप्रकरणी १४ जणांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.१५ ते ९.४५ वाजताच्या सुमारास गाथा लॉन्स, संतनगर, वाघोली रोड, लोहगाव येथे घडली. आमदार पठारेंच्या वाहनचालक फिर्यादी शकील अजमोद्दीन शेख (वय ४६ वर्षे, व्यवसाय – चालक, रा. गणपती हौसिंग सोसायटी, तुकारामनगर, खराडी, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कार्यक्रमादरम्यान बंडू शहाजी खांदवे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – अजित पवार गट) यांनी आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की केली. त्या वेळी फिर्यादी त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले असता, आरोपींनी रागाच्या भरात त्यांच्यावर एकत्रित हल्ला केला.
या हल्ल्यात बंडू खांदवे, शेखर मोझे, विलास खांदवे, कालीदास खांदवे, गणेश खांदवे, रामेश्वर पोळ, मेघराज खांदवे, प्रतिक खांदवे, सागर करजे, ओमकार उर्फ ओम्या खांदवे, हरीदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे तसेच ५ ते ६ अनोळखी इसम सहभागी होते. आरोपींनी फिर्यादीवर लाथाबुक्यांनी व जड वस्तूने मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन (किंमत अंदाजे ५० हजार रुपये) आणि रोख रक्कम १ हजार रुपये, असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२), ११८(१), १८९(२), १९०, ३५२, १९१(२) आणि ३०४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार पठारे यांच्यावर शनिवारी रात्री १० च्या सुमारास लोहगाव परिसरात हा हल्ला झाला होता. ज्या प्रश्नांबाबत खांदवे यांनी आंदोलन ठेवले होते, ती कामे होणार आहेत. असे पठारे यांनी सांगितल्यानंतर बंडू खांदवे याने ‘मी आंदोलन ठेवलं तुम्ही का विरोध करता’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यातून हे मारहाणीचे प्रकरण घडले होते. घटनेनंतर तात्काळ दखल घेत विमाननळ वरीष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, शरद शेळके, प्रशांत माने आणि नितीन राठोड यांनी गुन्हा दाखल करून घेतला. लोहगाव परीसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहवी म्हणून पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता. लोहगावात शांतता रहावी यासाठी प्रशासन सज्ज आहे. प्रकरणाचा पुढील तपास वपोनि गोविंद जाधव हे करत आहे.
...तर जनता त्यांना धडा शिकवेल
आम्ही राजकीय जीवनात कधीच ड्रेनेज, पाणी पाइपलाइन न टाकता रस्ते केले नाहीत. रस्त्याच्या कामांना उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि सुनियोजित हल्ला करून मीडियाला खोट्या प्रतिक्रिया त्यांनीच द्यायच्या. गावातील काही लोक बोलावून काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. चालक शकील शेख हे खासगी रुग्णालयात भरती असल्याने त्यांचा जबाब रात्री होऊ शकला नाही; परंतु शासकीय कर्मचारी म्हणून तक्रार दाखल केली आहे. पुतण्या सचिन पठारे यालाही मारहाण केली गेली. या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवार यांना पत्र देणार असल्याचे पठारे यांनी सांगितले. या प्रकरणी दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असता. कार्यकर्ते जोशात होते; परंतु आम्हीच त्यांना समजावले. त्यामुळे वातावरण निवळले. आमची भूमिका वाईट नाही, त्यांची असेल तर जनता त्यांना धडा शिकवेल, असे बापू पठारे यांनी पत्रकार परिषदेत सुनावले.