'हा घ्या पुरावा', मोहिते पाटील 9 वर्षापासून पवारांकडेच मागतायेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 13:55 IST2019-04-20T13:30:02+5:302019-04-20T13:55:22+5:30
रणजीतसिंह मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांच्या माढ्यातील भाषणाचा समाचार घेतला जात आहे.

'हा घ्या पुरावा', मोहिते पाटील 9 वर्षापासून पवारांकडेच मागतायेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण
सोलापूर - कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रश्नासाठी विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा घरोबा केला नसून त्यांच्या अनेक सहकारी व खाजगी संस्था अडचणीत असल्यामुळे त्यांचे स्थिरीकरण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केला, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते-पाटलांवर गंभीर आरोप केला होता. पवार यांच्या या आरोपानंतर रणजीतसिंह मोहिते पाटलांकडून पवारांना खोटं पाडण्यात येत आहे. एका पत्राचा दाखल देत पवारांनीच ही योजना रखडवल्याचं सांगण्यात येत आहे.
रणजीतसिंह मोहिते पाटील समर्थकांकडून शरद पवार यांच्या माढ्यातील भाषणाचा समाचार घेतला जात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोहिते-पाटलांना मागेल ते पद दिले. त्यांनी जो विकास केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केला. त्यांचा भाजपा प्रवेश भीमा-सीना स्थिरीकणासाठी नसून आर्थिक स्थैर्यासाठी असल्याचं पवार यांनी म्हटलं होतं. पवार यांच्या आरोपानंतर रणजीतसिंह मोहिते पाटील समर्थकांनी सन 2010 मध्ये शरद पवार यांना लिहिलेले पत्र व्हायरल केलं आहे. त्यामध्ये कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी अद्याप कामे सुरू झाली नाहीत, विशेष म्हणजे 2004 साली प्रशासनाने यास मंजुरीही दिली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील कामे सुरू झाली, पण सोलापूरमधील कामे अद्याप नसल्याचे मोहिते पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
विजयसिंह मोहिते पाटलांनी वारंवार पद असताना किंवा पद नसताना निधीची मागणी पवारांकडे केली. त्यास पवारांनी केराची टोपली दाखवली व मग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज यांच्याकडे शरद पवारांच्या नावाने विजयसिंहांनी निधी मागितला होता. सगळ्या सोलापूर जिल्ह्याला माहीती आहे निधीबाबत आडकाठी कोणी आणली, असे म्हणत पवारांनीच निधी देऊ न दिल्याचा आरोप रणजीतसिंह मोहिते पाटील फॅन क्लब या फेसबुक पेजवरून करण्यात आला आहे. मोहिते पाटलांना सत्तेत असताना कृष्णा भिमा स्थिरीकरणा बाबत वारंवार पत्रव्यवहार केला खुद्द शरद पवाराचे नाव निधीसाठी वापरले पण अजित पवारांनी योजनेची खिल्ली उडवली, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत हजेरी लावली. त्यावेळी, मोदींनी त्यांचे स्वागतही केलं. त्यावरुन पवारांनी विजयसिंह यांच्यावर खोचक टीका केली. भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांनी भविष्यात हाफ चड्डी, टोपी घालून फिरू नये. हे मला अजिबात आवडणार नाही. सत्तेसाठी लाचार होऊ नका, असे पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना म्हटले होते. पवारांच्या या वक्तव्यावरुनही मोहिते पाटील समर्थकांकडून पवारांना लक्ष्य करण्यात आलं आहे.