Meeting of Chief Minister and Raj in the North East Mumbai on the same day | उत्तर पूर्व मुंबईत मुख्यमंत्री, राज यांची एकाच दिवशी सभा
उत्तर पूर्व मुंबईत मुख्यमंत्री, राज यांची एकाच दिवशी सभा

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतील मराठी फॅक्टर लक्षात घेत, भांडुपमध्ये आघाडीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सेनेची मते मिळविण्यासाठी उद्धव ठाकरेंची सभाही घेण्याच्या तयारीत महायुतीचे उमेदवार आहेत. याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीची सभाही पार पडणार आहे.

गेल्या निवडणुकीत ‘आप’च्या मेधा पाटकर रिंगणात होत्या. या वेळी बहुजन वंचित आघाडी रिंगणात आहे. मानखुर्द शिवाजीनगर, विक्रोळी, घाटकोपर पश्चिमेकडील भागात, दलित, मुस्लीम लोकवस्ती अधिक आहे. मोदी लाट असतानाही मानखुर्द शिवाजीनगर भागातून आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांनी २० हजारांच्या मतांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे ही मते आपल्या बाजूनेच राहावी म्हणून त्यांनी फिल्डिंग लावली आहे. याच भागात शिवाजीनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर विक्रोळीच्या कन्नमवारनगर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार नेहारिका खोंदले यांच्यासाठी जाहीर सभा पार पडणार आहे. यात, बाळासाहेब आंबेडकर, असदुद्दिन ओवेसी, रेखा ठाकूरसह खोंदले या प्रमुख वक्त्या असणार आहेत. नेहारिका यांची राजकीय पार्श्वभूमी जरी नसली तरी, या सभेमुळे दलित, मुस्लीम मते काही प्रमाणात त्यांच्या बाजूने फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यापाठोपाठ उत्तर पूर्व मुंबईत सर्वाधिक म्हणजे ७ लाख मराठी मतदार आहेत. याच मराठी फॅक्टरला केंद्रस्थानी ठेवत २४ एप्रिल रोजी भांडुपच्या खडीमशीन परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्यासाठी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाटकोपरमध्ये सभेसाठी असणार आहेत. गुजरातमधील खासदार पुरुषोत्तम रूपाला यांचीही सभा मुलुंड, घाटकोपर परिसरात होणार आहे. विशेषत: गुजराती मतदार लक्षात घेत, या भागात रूपाला यांची सभा पार पडणार आहे. त्यापाठोपाठ भाजपविरोधी नाराज शिवसैनिकांची मते जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठीही भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे या सभांमुळे मतदारांचा कौल कुणाकडे आणि किती प्रमाणात फिरेल हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल.


Web Title: Meeting of Chief Minister and Raj in the North East Mumbai on the same day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.