Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 20:25 IST2024-10-23T20:24:41+5:302024-10-23T20:25:14+5:30
Maharashtra Assembly election Mahayuti Seat Sharing: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मकरंद पाटील यांचे नाव जाहीर केले आहे.

Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा!
नितीन काळेल, सातारा
Maharashtra Election 2024: महायुतीतील भाजपनंतर शिंदेसेनेने मंगळवारी रात्री ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार पक्षाने सातारा जिल्ह्यातीलही दोन उमेदवार जाहीर करत अपेक्षेप्रमाणे पाटणला शंभूराज देसाई आणि कोरेगावमधून महेश शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने वाईतून मकरंद पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरी महायुतीचा विद्यमान आमदारांवरच विश्वास असल्याचे दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातही उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. पण, अजूनही महायुती तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सत्र सुरूच आहे. तरीही युतीतील भाजपने पहिली यादी तीन दिवसांपूर्वी जाहीर करून जिल्ह्यातील तीन उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे.
त्यानंतर मंगळवारी रात्री शिंदेसेनेने पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आहे. पाटणमधून शंभूराज देसाई आणि कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे लढणार आहेत. तर महायुतीतील राष्ट्रवादीनेही बुधवारी दुपारी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यामध्ये वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
शंभूराज देसाईंविरोधात कोण?
जिल्ह्यातील उमेदवार जाहीर होत असतानाच आघाडीतून पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्याविरोधात कोण लढणार, हे महत्त्वाचे आहे. कारण, आघाडीत राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेलाही पाटण मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे वाटपात कोणाकडे मतदारसंघ राहणार, यावर लढत अवलंबून असेल. कोरेगावात आघाडीतील राष्ट्रवादीतून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे याठिकाणी मागीलप्रमाणेच आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यातच सामना होणार आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत नवे चेहरे नाही
सातारा जिल्ह्यात शिंदेसेनेकडून अनेक जणांनी निवडणूक लढण्याची तयारी केली. पण त्यांना संधी मिळणारच नाही, हे स्पष्ट होत आहे. तसेच शिंदेसेनेला जिल्ह्यात दोनपेक्षा अधिक मतदारसंघ मिळणार नाहीत. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना निवडणूक लढविण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.