lok sabha election 2019 Vote for someone who sends your kids to Oxford not Ayodhya says jignesh Mevani | तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्यांना मतदान करा- मेवाणी
तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्यांना मतदान करा- मेवाणी

नवी दिल्ली: तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केलं आहे. पूर्व दिल्ली मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार अतिशी यांच्यासाठी प्रचार करताना मेवाणींनी हे आवाहन केलं. हिंदू-मुस्लिम राजकारण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरीब मुलांना अयोध्येला पाठवायचं आहे, असं मेवाणी म्हणाले. 

'मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्यालाआपल्या पुढच्या पिढीला कुंभ किंवा अयोध्येला पाठवायचं नाही. तर ऑक्सफर्ड विद्यापीठात पाठवायचं आहे. अतिशी यांचं शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झालं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठांमध्ये पाठवूया,' असं आवाहन मेवाणींनी अतिशींसाठी प्रचार करताना केलं. 'अतिशी यांनी शिक्षण क्षेत्रात एक मॉडेल तयार केलं. तसं मॉडेल गुजरातमध्ये कुठेच दिसत नाही,' अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या गुजरात मॉडेलवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन सिलिंडरच्याअभावी 63 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यासाठी डॉ. काफील खान यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. त्यांनीदेखील अतिशी यांचा प्रचार केला. काफील खान यांनी ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले होते, असा दावा आपकडून करण्यात आला. 'अतिशींचा लढा आरएसएसचं समर्थन असलेल्या क्रिकेटपटूशी (गौतम गंभीर) आहे. त्यामुळे मतदारांनी अतिशींच्या मागे खंबीरपणे उभं राहावं,' असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार आहे. 
 


Web Title: lok sabha election 2019 Vote for someone who sends your kids to Oxford not Ayodhya says jignesh Mevani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.