"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 22:51 IST2024-10-15T22:47:41+5:302024-10-15T22:51:08+5:30
Mallikarjun Rami Reddy: भाजपाचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्यावर तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
Mallikarjun Rami Reddy suspended from bjp: "मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचे काम करणार नाही', असे म्हणणारे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची भाजपाने तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे नेते-पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. भाजपाचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला, तर कठोर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे रेड्डींवरील कारवाईनंतर म्हणाले.
माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी शिंदे, जयस्वालांबद्दल काय बोलले?
शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी घोषित केली. या मतदारसंघातून मल्लिकार्जून रेड्डी इच्छुक होते. २०१९ मध्ये आशिष जयस्वाल निवडून आल्यापासूनच रेड्डी त्यांच्याविरोधात सातत्याने टोकाची भूमिका घेत आले आहेत.
जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जून रेड्डींनी शिंदेंनाही लक्ष्य केले. "एकनाथ शिंदे हे ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता आम्हाला मुख्यमंत्री करायचं नाही. भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे. मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचं रामटेकमध्ये काम करणार नाही."
"मी महायुतीचा सन्मान करतो, पण आशिष जयस्वाल यांना विरोध आहे. नागपूर जिल्ह्यातून शिंदे गटाचा आमदार येऊ नये, अशी आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी आहे", असे रेड्डी म्हणाले होते. रेड्डींच्या विधानांची दखल घेत भाजपाने त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.
"पक्षाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. यापुढील काळात महायुतीविरोधात जो नेता किंवा कार्यकर्ता जाहीरपणे बोलेल किंवा पंड पुकारेल, त्याच्यावर कारवाई होईल. पक्षाच्या मंचावर प्रत्येकाला नाराजी मांडता येईल, सार्वजनिकपणे पक्षविरोधी भूमिका मान्य करण्यात येणार नाही", असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीविरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांनाही तंबी दिली आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघात वाद काय?
२००९ मध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. यावेळी आशिष जयस्वाल यांचा भाजपाचे मल्लिकार्जून रेड्डी यांनी पराभव केला. १२ हजार मताधिक्य घेऊन रेड्डी जिंकले होते. त्यानंतर २०१९ विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये ही जागा भाजपाकडे गेली. भाजपाने मल्लिकार्जून रेड्डी यांनी उमेदवारी दिल्यानंतर आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. जयस्वाल यांनी मल्लिकार्जून रेड्डी यांचा २४ हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हापासूनच रेड्डी आणि जयस्वाल यांच्यात संघर्ष निर्माण झाला.