'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 18:27 IST2024-10-08T18:24:50+5:302024-10-08T18:27:13+5:30
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha: अजित पवारांकडून गेल्या काही दिवसांत बारामतीतून निवडणूक लढवण्याबद्दल काही विधाने करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून, आज कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि उमेदवाराची घोषणा करण्याची मागणी केली. त्यामुळे गोंधळ उडाला.

'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
Ajit Pawar News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढवणार अशी दाट शक्यता आहे. युगेंद्र पवार सध्या मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. पण, अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण लढणार, याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. कारण गेल्या काही दिवसात अजित पवारांनी केलेल्या विधानांमुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. अशात आज अजित पवार बारामतीत आले, तेव्हा कार्यकर्त्यांनी उमेदवार जाहीर करण्याची मागणी करत त्यांची गाडी अडवली.
अजित पवार मंगळवारी बारामतीत होते. यावेळी मोठा नाट्यमय गोंधळ बघायला मिळाला. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. सगळ्या कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घातला आणि गाडी पुढे जाऊ देणार नाही, आधी उमेदवारी जाहीर करा, अशी मागणी केली.
बारामतीमधून तुम्हीच लढा
कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. बारामतीतून तुम्हीच निवडणूक लढा. बारामतीतून आमच्या मनातील उमेदवार तुम्हीच आहात. अजितदादा तुम्ही आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
कार्यकर्त्यांनी गाडीच रोखून धरल्याने अजित पवार गाडीतून खाली उतरले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावर "तुमच्या मनातील उमेदवार मी देईन", असे उत्तर अजित पवारांनी दिले.
"अजित पवारच बारामतीतून उमेदवार असतील"
दरम्यान, माध्यमांशी बोलता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजित पवारांची उमेदवारी जाहीर करून टाकली. ते म्हणाले, "मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृतपणे सांगतो की, अजित पवार हे बारामतीतून उमेदवार असतील. मी पहिली जागा जाहीर करतो", अशी घोषणा त्यांनी केली.