पिंपरी महापालिकेला कर्जातून बाहेर काढणार; अजित पवारांची भाजप आमदारांवर नाव न घेता टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:28 IST2025-12-29T13:27:53+5:302025-12-29T13:28:46+5:30
नुसत्या जाहिराती आणि कागदी विकासाने शहर चालत नाही. नियोजन, पारदर्शकता आणि कामाची गती महत्त्वाची असते

पिंपरी महापालिकेला कर्जातून बाहेर काढणार; अजित पवारांची भाजप आमदारांवर नाव न घेता टीका
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दबावाचे आणि ठेकेदार पोसण्याचे राजकारण सुरू असून, महापालिका कर्जबाजारी होण्यास सत्ताधाऱ्यांची धोरणे जबाबदार असल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. नाव न घेता शहरातील भाजप आमदारावर टीका केली. “मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे. संधी मिळाली तर महापालिकेला कर्जातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
पवार म्हणाले, “मी विकास केला, रस्ते केले, फ्लायओव्हर बांधले. तुम्ही पाच वर्षांत काय केलं ते सांगा. रस्ते सफाईसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या, पण प्रत्यक्षात रस्ते धूळ खात पडले आहेत. या निविदा शहरासाठी होत्या की ठेकेदारांना पोसण्यासाठी? पिंपरी-चिंचवड शहर दोघांनी वाटून घेतलं आहे. काही निवडक लोकांच्या प्रॉपर्ट्या कशा वाढल्या? बाकी लोक काम करत नाहीत का? हा पैसा कुठून येतो, याची उत्तरे द्यावी लागतील. “नुसत्या जाहिराती आणि कागदी विकासाने शहर चालत नाही. नियोजन, पारदर्शकता आणि कामाची गती महत्त्वाची असते. इथे मात्र दबावाचं राजकारण करून निर्णय घेतले जात आहेत.”
आमच्या कार्यशील उमेदवारांना निवडून द्या
पूर्वी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेलं पिंपरी-चिंचवड आता पुन्हा सक्षम, स्वच्छ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनुभवी व नव्या नेतृत्वाचा योग्य समन्वय आवश्यक आहे. जनतेच्या भल्यासाठी जे लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. पिंपरी चिंचवडच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या कार्यशील उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन अजित पवारांनी यावेळी नागरिकांना केलं.