कोणाचा होणार पत्ता कट ? भाजप-सेना संभाव्य युतीमुळे थेरगावातील इच्छुक धास्तावले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:30 IST2025-12-23T16:30:10+5:302025-12-23T16:30:53+5:30
शिवसेनेबरोबर युती झाल्यास चार जणांच्या पॅनलमध्ये काही जागा विभागल्या जाणार आहे. त्यामुळे, मागील काही वर्षे जोरदार तयारी केलेल्या भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोणाचा होणार पत्ता कट ? भाजप-सेना संभाव्य युतीमुळे थेरगावातील इच्छुक धास्तावले..!
हिंजवडी : आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे आदेश मिळताच सर्व इच्छुक कामाला लागले आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये तर संभाव्य पॅनल तयार करून, प्रचार आणि विविध कार्यक्रम घेण्याचा इच्छुकांनी सपाटा लावला आहे. मात्र, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदेसेना) यांची युती होण्याचे संकेत मिळताच भाजप इच्छुक धास्तावले आहेत.
शिवसेनेबरोबर युती झाल्यास चार जणांच्या पॅनलमध्ये काही जागा विभागल्या जाणार आहे. त्यामुळे, मागील काही वर्षे जोरदार तयारी केलेल्या भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, थेरगाव परिसरात अनुक्रमे प्रभाग २३ आणि प्रभाग २४ चा समावेश होतो. आरक्षणानुसार अनेकांनी संभाव्य पॅनल तयार करून, विविध कार्यक्रम घेत, मतदारांपर्यंत पोहोचून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, शिंदेसेनेबरोबर युती होण्याचे खात्रीशीर संकेत मिळाल्याने आता पॅनलमधल्या कोणत्या जागा विभागल्या जातात, याकडे थेरगावातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष..!
थेरगाव परिसरातील दोन्ही प्रभागांत सत्ताधारी भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीकडूनही इच्छुक अधिक आहे. सध्या भाजप आणि शिंदेसेना युती होणार असल्याचे बोलले जात असल्याने, ‘युतीचा फॉर्म्युला नेमका काय?’ याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे वरच्या पातळीवर युतीचे सूर जुळत असताना, दुसरीकडे थेरगावातील इच्छुक मात्र संभ्रमात सापडले आहेत. कोणाचा पत्ता कट होणार, कोणाला संधी मिळणार, याची चर्चा सध्या थेरगावात रंगली आहे.