Pimpri Chinchwad: अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:47 IST2025-02-22T11:46:08+5:302025-02-22T11:47:10+5:30
चिंचवडला सर्वाधिक २,७७८ कोटी, भोसरीला १,९१६ कोटी तर सगळ्यात कमी १,१८० कोटींचा निधी पिंपरीत देण्यात आला आहे

Pimpri Chinchwad: अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण
पिंपरी : महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या वर्षीपेक्षा ४१५ कोटींची वाढ करत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाला झुकते माप देण्यात आले आहे, तर सगळ्यात कमी निधी पिंपरी मतदारसंघात देण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी निधी मिळविण्यासाठी तिन्ही मतदारसंघांतील भाजपच्या आमदारांनी आयुक्तांच्या भेटी घेत जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी गळ घातली होती.
अर्थसंकल्पात स्वत:च्या मतदारसंघात नवीन कामे आणि त्यासाठी जास्तीत-जास्त तरतूद करावी, यासाठी भाजपच्या चार आमदारांनी आयुक्तांसाेबत स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. विधान परिषदेचे आमदार अमित गाेरखे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी गुरुवारी (दि. १३) स्वतंत्र बैठका घेत जास्तीच्या निधीची मागणी केली होती. गोरखे यांनी पिंपरीसाठी अधिकचा निधी देण्याची मागणी केली होती. भाेसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी (दि. १४) आणि विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी शनिवारी (दि. १५) बैठक घेतली. यावरून भाजप आमदारांमध्येच निधी खेचून आणण्यासाठी रस्सीखेच झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, यात चिंचवड मतदारसंघाने आघाडी घेत जास्त निधी मिळवला आहे.
चिंचवडमध्ये २,७७८ ची तरतूद
चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक २,७७८ कोटींची विकासकामे करण्यात येणार आहेत. त्याखालोखाल भोसरी मतदारसंघात १,९१६ कोटीचा खर्च विकासकामांवर करण्यात येणार आहे. सगळ्यात कमी १,१८० कोटींचा निधी पिंपरीत देण्यात आला आहे. त्यात ५५० कोटींच्या महापालिकेच्या नव्या इमारतीचा समावेश आहे. तसेच १८० कोटींची अग्निशमन विभागाची इमारत आहे.
सामायिक प्रकल्पांसाठी ३८२ कोटी
शहरातील तिन्ही मतदारसंघनिहाय विकासकामांव्यतिरिक्त ३८२ कोटींचा निधी सामायिक कामांवर खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये जलवाहिनी, सांडपाणी, मल्लनिस्सारण वाहिनी प्रकल्प, हरित सेतू, आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, रस्ते आदी सेवांचा समावेश आहे.
शहराच्या विकासाची गरज पाहून निधींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोणाला झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका