PCMC Mayor: बिनविरोध नगरसेवक ते बिनविरोध महापौर; राजकारणाचे बाळकडू घरातूनच, कोण आहेत रवी लांडगे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:16 IST2026-02-07T16:16:03+5:302026-02-07T16:16:34+5:30

PCMC Mayor रवी लांडगे महापालिकेच्या २०१७ मधील आणि आताच्या निवडणुकीत सलग २ वेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

PCMC Mayor From unopposed corporator to unopposed mayor; A political darling from home, who is Ravi Landge? | PCMC Mayor: बिनविरोध नगरसेवक ते बिनविरोध महापौर; राजकारणाचे बाळकडू घरातूनच, कोण आहेत रवी लांडगे?

PCMC Mayor: बिनविरोध नगरसेवक ते बिनविरोध महापौर; राजकारणाचे बाळकडू घरातूनच, कोण आहेत रवी लांडगे?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे रवी बाबासाहेब लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. ते महापालिकेच्या २०१७ मधील आणि आताच्या निवडणुकीत सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. बिनविरोधची परंपरा कायम ठेवत त्यांनी ४१ व्या वर्षी महापौरपदही मिळवले. त्यांच्या रूपाने भाजपकडून निष्ठावंताला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग सहा धावडेवस्ती-भगतवस्तीमधून रवी लांडगे पहिल्यांदा बिनविरोध नगरसेवक झाले. भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर आताच्या निवडणुकीत ते पुन्हा त्याच प्रभागातून बिनविरोध नगरसेवक झाले. भोसरी येथे १५ ऑगस्ट १९८४ रोजी जन्मलेले लांडगे डी. फार्मसी झाले आहेत. त्यांना शेती, वाचन आणि खेळाची आवड आहे.

राजकारणाचे बाळकडू घरातूनच

रवी लांडगे यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे यांनी जनसंघाच्या काळापासून राजकीय क्षेत्रात काम केले होते. त्यांनी १९९२ मध्ये नगरसेवक व विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. रवी यांचे चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी शहरात भाजप रूजवली. ते १९९७ मध्ये नगरसेवक होते. नंतर विरोधी पक्षनेते व भाजपचे शहराध्यक्षही होते. चुलत्यांच्या निधनानंतर २००७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी रवी लांडगे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. ते २०१५ मध्ये भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आणि २०१७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक बनले. त्यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे याही माजी नगरसेविका आहेत.

भाजप ते उद्धवसेना ते परत भाजप

मागीलवेळी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याने रवी लांडगे नाराज झाले होते. भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी २०२४ मध्ये उद्धवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, भोसरीची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटली. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून ते पुन्हा स्वगृही भाजपमध्ये आले आणि प्रभाग सहामधून बिनविरोध निवडून आले. सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला. भोसरीतील २०० खाटांच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव त्यांनी जनआंदोलन उभारून हाणून पाडला.

Web Title : रवि लांडगे: निर्विरोध पार्षद से महापौर तक, राजनीतिक विरासत

Web Summary : रवि लांडगे, दो बार निर्विरोध पार्षद, पिंपरी-चिंचवड के महापौर बने। राजनीतिक विरासत को आगे बढ़ाते हुए, उन्होंने उद्धव सेना के साथ संक्षिप्त कार्यकाल के बाद स्थानीय शासन में अपने पिता और चाचा के पदचिह्नों का अनुसरण किया। वे भाजपा में लौट आए और फिर निर्विरोध जीते।

Web Title : Ravi Landge: From Unopposed Corporator to Mayor, a Political Legacy

Web Summary : Ravi Landge, unopposed corporator twice, became Pimpri-Chinchwad's mayor. Inheriting a political legacy, he followed his father's and uncle's footsteps in local governance after a brief stint with Uddhav Sena. He returned to BJP and won unopposed again.