PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:23 IST2026-01-15T09:22:08+5:302026-01-15T09:23:41+5:30
PCMC Election 2026 महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले

PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद
पिंपरी : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला.
मात्र सकाळच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेहरूनगर, चिंचवडगाव येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याचे प्रकार घडले. त्यामुळे मतदान प्रक्रियेला तात्पुरता विलंब झाला. निवडणूक प्रशासनाने तातडीने पर्यायी मशिन उपलब्ध करून देत मतदान सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या.
दरम्यान, मतदान केंद्रांमध्ये मोबाईल फोन नेण्यास घातलेल्या बंदीमुळे काही ठिकाणी वादाचे प्रसंगही पाहायला मिळाले. मतदानासाठी आलेल्या मतदारांनी मोबाईल नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत निवडणूक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करत कर्मचाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी केली.
काही ठिकाणी यामुळे तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. प्रशासनाकडून सर्व केंद्रांवर परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून मतदारांनी शांततेत व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीत गोंधळ: स्लिप पोहोचल्याच नाहीत
महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक मतदारांना अद्याप मतदार स्लिप मिळालेल्या नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही भागांत घराघरांत स्लिप वितरणच झाले नसल्याचे मतदारांनी सांगितले. त्यामुळे मतदान केंद्र शोधण्यात अडचणी येत असून सकाळच्या वेळेत अनेक मतदार परत फिरल्याचेही आढळले.