PCMC Election 2026: ‘लाडक्या बहिणीं’च्या मतांवर तिघांचा डोळा; मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:10 IST2026-01-13T11:09:45+5:302026-01-13T11:10:12+5:30
PCMC Election 2026 यंदाच्या महापालिका निवडणुकीत हीच योजना आता महायुतीसाठी ताकद ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत

PCMC Election 2026: ‘लाडक्या बहिणीं’च्या मतांवर तिघांचा डोळा; मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला?
पिंपरी : ‘मुख्यमंत्री : लाडकी बहीण योजना’ वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी तारणहार ठरली होती. ‘लाडक्या बहिणीं’च्या एकगठ्ठा मतदानामुळे महायुतीचा विजय साकारला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत हीच योजना आता महायुतीसाठी ताकद ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, कारण यावेळी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
विधानसभेवेळी लाभार्थी लाडक्या बहिणींचा कौल एकगठ्ठा महायुतीच्या पारड्यात पडला आणि त्याचा थेट फायदा भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना झाला. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीतील तिन्ही घटक पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत. ही लढत महायुतीतच काट्याची बनली आहे.
‘लाडकी बहीण’ तिघांची, मत मात्र एकच!
शहरात लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे ३ लाख ८९ हजार ९२० महिला लाभार्थी आहेत. त्यांचा कौल सर्वच ३२ प्रभागांमध्ये उलथापालथ करणारा आहे. त्यामुळे प्रचारात तिन्ही पक्षांचे नेते ‘ही योजना आमचीच’, ‘महिलांसाठी आम्हीच लढलो’ अशा श्रेयवादात अडकले आहेत. लाडक्या बहिणींच्या मतांवर तिन्ही पक्षांचा डोळा असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
मतविभाजनाचा खेळ, फटका कुणाला?
योजनेच्या श्रेयावर तिन्ही पक्षांचा दावा असला तरी लाडक्या बहिणींची मते विभागली जाण्याची शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना यांच्यात ही मते फुटल्यास त्याचा नेमका फटका कोणाला बसणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक प्रभागांतील निकाल लाडक्या बहिणींच्या मतावर ठरण्याची चिन्हे आहेत.
बहिणींचा कौल कुणाच्या बाजूने?
महापालिका निवडणुकीसाठी १५ ला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी आहे. लाडक्या बहिणींचा कौल भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) की शिंदेसेनेच्या पारड्यात पडतो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. या मतविभाजनाचा राजकीय अर्थ काय आणि त्याचा महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर नेमका कसा परिणाम होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.