PCMC Election 2026: अपेक्षित जागा नाहीत; पिंपरीत शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शेवटच्या २ तासांत उतरवले ७० उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:42 IST2025-12-31T12:41:05+5:302025-12-31T12:42:29+5:30
PCMC Election 2026 मंत्री उदय सामंत यांनी ‘कुठल्याही महापालिकेमध्ये महायुती तुटल्याचे चित्र नाही' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे माघारीपर्यंत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

PCMC Election 2026: अपेक्षित जागा नाहीत; पिंपरीत शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शेवटच्या २ तासांत उतरवले ७० उमेदवार
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटली आहे. अपेक्षित जागा न दिल्याने शिंदेसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. शेवटच्या दोन तासांत ७० उमेदवार उतरविले आहेत. आता माघारीपर्यंत काय होणार याबाबत उत्सुकता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटली आहे. शिंदेसेनेने आठ प्रभागांनुसार एबी फॉर्म वाटपाची जबाबदारी दिली होती. भाजप आणि राष्ट्रवादीकडून डावललेल्यांना गळाला लावण्यासाठी रणनीती आखली गेली. त्यानुसार सकाळी बारा ते दुपारी दोन या वेळेत पॅनल तयार करून अर्ज भरून देण्यात येत होते. एकूण ८० जणांना एबी फॉर्म दिले होते. मात्र, दहा फार्म वेळेत पोहोचले नाहीत. सविस्तर यादी तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वरिष्ठ काय निर्णय घेणार?
महापालिकेत महायुती होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे शिंदेसेना नाराज झाली. मंत्री उदय सामंत यांनी ‘कुठल्याही महापालिकेमध्ये युती तुटली नाही. महायुती तुटली असे चित्र कुठेही नाही,’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे माघारीपर्यंत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
यादी उशिरापर्यंत जाहीर नाही
शहरप्रमुख नीलेश तरस यांनाही भाजप जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे सोमवारी पहाटे एकला चर्चा थांबली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भाजपशी युती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र, शेवटपर्यंत चर्चेवर निर्णय झाला नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये याचीही जबाबदारी होती. त्यामुळे शेवटच्या दोन तासांत प्रयत्न केले. ७० उमेदवार दिले आहेत. युतीला गालबोट लागू नये आमची इच्छा होती. मात्र, पर्यायच न राहिल्याने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.