PCMC Election 2026: मग ५ वर्षात नक्की काय केलं? आता जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या भाजपला अमोल कोल्हेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:53 IST2026-01-13T10:52:54+5:302026-01-13T10:53:07+5:30
PCMC Election 2026 भाजपने सत्तेत असताना महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून पालिकेला कर्जबाजारी केले

PCMC Election 2026: मग ५ वर्षात नक्की काय केलं? आता जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या भाजपला अमोल कोल्हेंचा सवाल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात नदी सुधार, भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन करण्याचेही आश्वासन दिले आहे. मग पाच वर्षांत नक्की केले काय, असा सवाल राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी केला.
पिंपरी गावात झालेल्या सभेत ते बोलत होते. दिव्यांगाला झालेली मारहाण, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या घरावर जाऊन केलेली शिवीगाळ या गोष्टींचा उल्लेख करून डॉ. कोल्हे म्हणाले की, महिला भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा राजकीय चौरंगा झाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. कोल्हे म्हणाले की, भाजपने सत्तेत असताना महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पालिकेला कर्जबाजारी केले. एसटीपीचे काम करणाऱ्या कंपनीची उलाढाल १५ कोटींवरून १५ हजार कोटींवर कशी गेली? डब्ल्यूटीई, एसटीपी प्लांटचे थर्ड पार्टी ऑडिट केल्यास सगळे काही उघड होईल. एवढे सारे करून इंद्रायणी फेसाळते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, भाजपने त्याला उत्तरे का दिली नाहीत?
रूपाली ठोंबरे म्हणाल्या, दहशतीमुळे आमची एखादी भगिनी खच्ची होणार असेल तर ते होऊ देणार नाही. हा प्रकार अचानक घडला नाही. तो घडवून आणला. ज्यांच्या घरात राजकीय वारसा आहे, ते लोकशाहीचा असा गळा दाबतात हे चुकीचे आहे.