PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेत भ्रष्टाचाराचा राक्षस; अजित पवारांकडून आरोप; भाजप नेते मात्र मौन बाळगून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:09 IST2026-01-05T13:09:22+5:302026-01-05T13:09:37+5:30
PCMC Election 2026 भ्रष्टाचाराला विरोध करणारा पक्ष, आरोप झाल्यावर राज्य नेतृत्व गप्प का, असा प्रश्न पिंपरीतील नागरिक विचारू लागले आहेत.

PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेत भ्रष्टाचाराचा राक्षस; अजित पवारांकडून आरोप; भाजप नेते मात्र मौन बाळगून
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर थेट आणि गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करूनही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने जणू ‘मौन’च स्वीकारले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराचा शुभारंभ करताना केवळ ‘खोटा नॅरेटिव्ह’, ‘स्क्रिफ्ट’, ‘पायाखालाची वाळू सरकली’, ‘अजित पवार यांना घेतल्याचा पश्चाताप’ या मुद्द्यांशिवाय पवारांच्या महापालिकेवरील आरोपांना उत्तर दिले नाही, याची चर्चा शहरात आहे.
राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ फोडत अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपवर टीका केली. भ्रष्टाचारी राक्षस, दहशत, टेंडर रिंग आणि सत्तेचा माज याने कळस गाठल्याचा थेट आरोप त्यांनी केला. स्थानिक आमदारांचे नाव न घेता बोट ठेवले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात झाली. त्यात चव्हाण यांनी पवारांचे आरोप खोटे आहेत, आम्ही खाणार नाही आणि खाऊही देणार नाही, असे वक्तव्य केले.
राज्य नेतृत्व गप्प का?
भाजपची संघटनात्मक बैठक झाली. उमेदवारांवर चर्चा झाली; मात्र राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कुणीही बोलले नाही. त्यामुळे ‘उत्तर द्यायचेच नाही’ हीच भाजपची रणनीती आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणारा पक्ष, आरोप झाल्यावर राज्य नेतृत्व गप्प का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
वरिष्ठ नेतेच उत्तर देतील...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर आरोप केल्यानंतर शहराचे आमदार तथा भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांना पत्रकारांना विचारले. त्यावर राज्य आणि राष्ट्रीय नेतेच प्रतिक्रिया देतील, असे त्यांनी सांगितले. यावर भाजपचे चार आमदारही गप्पच आहेत.
पवारांनी भाजपवर केलेले आरोप...
- स्मार्ट सिटी प्रकल्प आणि अर्बन स्ट्रीट डिझाइनने रस्ते सुशोभीकरण- हरित सेतू, दर वाढवून पंतप्रधान आवास योजनेचे काम, फायबर केबल डक्टचे काम निकृष्ट
- शाळेतील ई-लर्निंग प्रकल्प दर्जाहीन, दीड लाखाऐवजी ५५ हजार रुपये किमतीचे एलईडी टीव्ही खरेदी, मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंग, भटक्या कुत्र्यांची कागदोपत्री नसबंदी.
- रस्ते खोदकाम व दुरुस्ती, वृक्षलागवड व संवर्धन बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे काम, टेल्को रस्त्यावरील सव्वा मीटर रस्त्यासाठी ८१ कोटींचा खर्च, डीपी विशिष्ट लोकांसाठी, स्मार्ट पार्किंग विकसित केले नाही, पब्लिक बायसिकल शेअरिंग, बेकायदा पार्किंग झोन, रस्ते कामे ३० ते ३५ टक्के जास्त वाढीव दराने केली.