PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:02 IST2026-01-10T19:01:39+5:302026-01-10T19:02:23+5:30
PCMC Election 2026 दादा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले काम बोलते आहे. त्या कामामुळेच हा वैताग, त्रागा आणि राग दिसत आहे. समोरचे लोक रागावले म्हणून आपण रागावण्याची गरज नाही

PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
पिंपरी : भाजपचे काम बोलत आहे, म्हणूनच विरोधक वैतागले आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काम नाही, म्हणून वादावादी सुरू आहे. कोणाच्याही टीकेला उत्तर देण्याची गरज नाही; तुम्ही केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांना दिले. मात्र राष्ट्रवादी (अजित पवार)चे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारावर केलेल्या टीकेला थेट उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. आकुर्डीत शनिवारी (दि. १०) भाजपची विजयी संकल्प सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पूर्वीपेक्षा जास्त जागा निवडून आणेल. ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत १५ वर्षे घरांची कामे रखडली. ती निकृष्ट दर्जाची बनविण्यात आली. त्यामुळे तिकडे राहण्यासही लोक गेले नाहीत. मोदी सरकारच्या काळात बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव व चऱ्होली येथे पंतप्रधान आवास योजनेतून दर्जेदार घरे दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध समस्या भाजपच्या काळातच सोडविण्यात आल्या. महापालिका शाळांचा दर्जा सुधारला असून या शाळांमधील प्रवेश दरवर्षी वाढत आहेत.
दिव्यांग भवन, सक्षमा योजना, कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया, कचऱ्याला ‘संपत्ती’ म्हणून वापरण्यात देशात महापालिकेचा प्रथम क्रमांक, पर्यावरण कृती आराखडा तयार करणारी पहिली महापालिका अशी भाजपची कामगिरी त्यांनी मांडली. बायोमायनिंग प्रकल्पांनाही आता मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
शास्तीकर, प्रॉपर्टी कार्डचा विषय मार्गी
फडणवीस म्हणाले की, शास्तीकराचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होता; मात्र एका झटक्यात ३०० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ केला. प्राधिकरणातील बाधितांचा १२.५ टक्के परतावा व प्रॉपर्टी फ्री होल्डचा प्रश्न मार्गी लावला. यामुळे महापालिकेच्या करात सुमारे ३५० कोटींची भर पडली. रेडझोन, निळ्या-लाल पूररेषेचा प्रश्नही मार्गी लावू.
शहराची ‘सेफ सिटी’कडे वाटचाल
फडणवीस म्हणाले की, शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जाणार असून पिंपरी-निगडी मार्गाचे काम सुरू आहे, तर निगडी-चाकण व तिसरा मार्ग लवकरच होणार आहे. त्यामुळे शहराला मेट्रोचा तिसरा मार्ग मिळेल. मुळा-पवना-इंद्रायणीचे संवर्धन, भामा-आसखेड धरणाचे पाणी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होत आहेत. स्मार्ट सिटी व अमृत योजनांमुळे राज्याला मोठा निधी मिळाला. दोन हजार सीसीटीव्ही, फायबर ऑप्टिक नेटवर्कमुळे ‘सेफ सिटी’कडे वाटचाल सुरू आहे. कमी काळात भाजपने विकास करून दाखवला आहे. लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ करू. पुणे-पिंपरी-चिंचवड ही वाढणारी शहरे अधिक मोठी करायची असतील तर महापालिकेत भाजपची सत्ता आवश्यक आहे.
‘एसआरए’बाबत धमक्या देणाऱ्यांचा बंदोबस्त
शहरातील एकजण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा (एसआरए) ‘बाप’ समजतो. त्याला जागेवर आणावे लागले, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी व्यासपीठावरून केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथे कायद्याचे राज्य आहे. मी गृहमंत्री आहे, हे लक्षात ठेवा. एसआरएबाबत कोणी धमक्या देत असेल, तर त्यांच्याकडे पोलिसच बघून घेतील. एसआरएच्या समितीचा मुख्यमंत्री म्हणून मी प्रमुख आहे. जो कोणी धमक्या देईल, त्याच्यावर १६ जानेवारीनंतर योग्य कारवाई केली जाईल.
अजित पवारांविरोधात बोलणे टाळले
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार महेश लांडगे यांनी व्यासपीठावरून राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘आमचे महेशदादा लांडगे सध्या थोडे वैतागलेले दिसत आहेत. कारण निवडणुका जवळ आल्या की अनेकांचा कंठ फुटतो आणि काहीही बोलले जाते. मात्र दादा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले काम बोलते आहे. त्या कामामुळेच हा वैताग, त्रागा आणि राग दिसत आहे. समोरचे लोक रागावले म्हणून आपण रागावण्याची गरज नाही. आपण फक्त आपले काम जनतेसमोर ठेवा. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काम नाही. त्यामुळेच ते मुद्द्यांवर चर्चा न करता वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’