PCMC Election 2026: पिंपरीत सगळेच पक्ष स्वबळावर; बंडखोरांना रोखण्याचे भाजप-राष्ट्रवादीसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:35 IST2026-01-01T13:31:48+5:302026-01-01T13:35:28+5:30
PCMC Election 2026 भाजपने डावलेल्यांनी दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली तर राष्ट्रवादीकडून डावलेल्यांनी भाजप आणि शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे

PCMC Election 2026: पिंपरीत सगळेच पक्ष स्वबळावर; बंडखोरांना रोखण्याचे भाजप-राष्ट्रवादीसमोर आव्हान
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बंडखोरांचे पीक फोफावणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या घटकापर्यंत बंडखोरी रोखण्याचे आव्हान सर्वच पक्षांच्या नेत्यांसमोर असणार आहे.
महापालिकेच्या १२८ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेना-मनसे, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले आहेत. भाजप-रिपाइंने १२८, दोन्ही राष्ट्रवादीने १२८, कॉँग्रेसने ५२, शिंदेसेनेने ६९ जागांवर उमेदवार दिले असून, चार जागा पुरस्कृत केल्या आहेत. अन्य जागांवर शिंदेसेना काय निर्णय घेणार, हे गुलदस्त्यात आहे.
यांच्याकडे उमेदवारी नाही, तर लगेच त्यांच्याकडे..!
पक्षाचे तिकीट मिळाले नाही, म्हणून अपक्ष लढणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी, त्यामध्ये मातब्बरांची संख्या कमी आहे. भाजपने डावलेल्यांनी दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली तर राष्ट्रवादीकडून डावलेल्यांनी भाजप आणि शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे. ज्यांना भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने उमेदवारी दिली नाही, त्यांनी काँग्रेस, उद्धवसेना व इतर पक्षांचा आधार घेतला आहे.
दोन दिवसांचा अवधी
बंडखोरांची संख्या भाजप आणि राष्ट्रवादीत अधिक असणार आहे. त्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान भाजप आणि राष्ट्रवादीसमोर आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत दि. २ जानेवारीपर्यंत आहे. बंड रोखण्यासाठी दोन दिवसांचा अवधी असणार आहे.
या भागातून भरले अधिक अर्ज
चिंचवड गावठाण, तानाजीनगर प्रभाग क्रमांक १९ मधून ११९, दापोडी प्रभाग ३० मधून ११२, नेहरूनगर प्रभाग ९ मधून ९५, कुदळवाडी क्रमांक ११ मधून ८८, गणेशनगर, कवडेनगर प्रभाग ३१ मधून ८७, पुनावळे-ताथवडे प्रभाग २५ मधून ८०, काळेवाडी विजयनगर प्रभाग २२ मधून ८६, संत तुकारामनगर प्रभाग २० मधून ८० अर्ज दाखल झाले आहेत. तळवडे गावठाण प्रभाग १२ मधून सर्वांत कमी २८ अर्ज भरले गेले आहेत.