खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी; आता मावळात पावणे अठरा लाख जप्त, पुण्यात चाललंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 17:39 IST2024-10-24T17:38:48+5:302024-10-24T17:39:06+5:30
कारचालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले

खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी; आता मावळात पावणे अठरा लाख जप्त, पुण्यात चाललंय काय?
पिंपरी : काही दिवसापूर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर खासगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. सुरुवातीला ही रक्कम १५ कोटी असल्याचे जाहीर केले. नंतर ५ कोटी असल्याचे सांगण्यात आले. आता पुन्हा मावळमध्ये पावणे अठरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळातच मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मावळ विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कारमधून १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली.
कारचालक पियुष जखोडीया (वय ३४) यांना ताब्यात घेतले आहे. मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये रोकड सापडली. कारचालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली आहे.