प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:42 PM2024-05-28T12:42:32+5:302024-05-28T12:48:07+5:30

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता १ जूनला सातवा आणि अखेरचा टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींसह भाजपाचे सर्व नेते लोकसभा निवडणुकीत ४०० पार जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. तर काँग्रेस इंडिया आघाडी आमचेच सरकार येणार असल्याचं बोलत आहेत. यातच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या विजयाचा दावा केला आहे.

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत जे अंदाज वर्तवले आहेत त्यामुळे काँग्रेससह विरोधी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. तर भाजपाला मोठा दिलासा मिळत आहे. भाजपा ३७० पर्यंत पोहचणार नाही परंतु २७० जागांपेक्षा खालीही येणार नाही. मागील काही दिवसांपासून पीके यांच्या ५ विधानांनी भाजपाची कामगिरी चांगली राहिली हे दिसून येते.

भाजपा यंदाच्या निवडणुकीत २०१९ पेक्षा चांगली कामगिरी करेल. मागील निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. तर यंदा त्याहून अधिक जागा मिळतील. भाजपानं ३०३ पैकी २५० जागा नॉर्थ वेस्टमध्ये जिंकल्या होत्या. त्यामुळे या भागात भाजपाला किती नुकसान होतंय, भाजपा या राज्यात ५० जागा हरतील का हे पाहावं लागेल असं प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत म्हटलं.

भाजपा यंदा दक्षिणेकडील राज्यात जास्त जागा मिळवेल. दक्षिण आणि पुर्वेकडील राज्यातील जागांमध्ये वाढ होईल. बिहार, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेशात भाजपाला फायदा होईल.

सध्याच्या घडीला या राज्यांमध्ये भाजपाला ५० जागा आहेत. परंतु या राज्यात भाजपाच्या मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीही वाढण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये भाजपाच्या १५-२० जागा वाढण्याचा अंदाज आहे.

विरोधकांच्या दाव्यानुसार उत्तर प्रदेशात भाजपाच्या जागा कमी होत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत बिहार, यूपी मध्ये २५ जागांचा फटका बसला होता, तेव्हा सपा-बसपा एकत्र होती. परंतु आता भाजपाला २० जागांचे नुकसान होतंय असं कुणी म्हणत असेल तर भाजपाला कुठे नुकसान होतंय? ते याआधीही १८ जागा हरले होते.

भाजपा उत्तर प्रदेशात ४०-५० जागा हरल्या तर मोठं नुकसान झालं म्हणता येईल. परंतु असा दावा ना विरोधी पक्ष करतोय ना सत्ताधारी त्यामुळे बिहार, यूपीमध्ये भाजपाला फार मोठं नुकसान होईल असं दिसत नसल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

विरोधी पक्ष महाराष्ट्राबाबत दावा करतोय, याठिकाणी भाजपाला मोठं नुकसान होतंय. मात्र महाराष्ट्रात जर विरोधी पक्षाने २०-२५ जागा जिंकल्या तरीही भाजपाला नुकसान होणार नाही. आता भाजपाकडे महाराष्ट्रात २३ जागा आहेत त्यामुळे त्यांच्या जागा घटणार नाही असं प्रशांत किशोर यांनी सांगितले.

जर विरोधी इंडिया आघाडीचे नेते राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यात भाजपाला मोठं नुकसान होईल असा दावा करत असतील तर प्रशांत किशोर यांनी वेगळेच गणित मांडलं.

राजस्थान, हरियाणासारख्या राज्यात भाजपाला २-५ जागांचे नुकसान होऊ शकते. परंतु त्यामुळे भाजपाच्या विजयावर फारसा फरक पडणार नाही. पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यात भाजपाला ५० जागांचे नुकसान होईल असा दावा असेल तर काही प्रमाणात या जागांची भरपाई दक्षिण आणि पुर्वेकडील राज्यात भरून निघेल असं प्रशांत किशोर यांनी सांगितले.