असदुद्दीन ओवेसी अन् काँग्रेसची पडद्यामागून मैत्री?; हैदराबादमध्ये राजकीय समीकरण बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:48 PM2024-04-12T18:48:53+5:302024-04-12T18:55:12+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे तेलंगणातील हैदराबादमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. ही जागा नेहमी चर्चेत राहिली आहे. कारण याठिकाणी असदुद्दीन ओवेसी हे खासदार आहेत. यंदा ओवेसींच्या गड ताब्यात घेण्यासाठी भाजपानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

त्यातून हैदराबादमध्ये नवीन समीकरण तयार होताना दिसतेय. ओवेसी नेहमी काँग्रेसविरोधात बोलताना दिसत होते, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना आरएसएसचा एजेंट बोलायचे. परंतु आता ओवेसींचा सूर मावळला आहे. त्यामुळे पडद्यामागून काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसी यांनी हातमिळवणी केलीय का अशी चर्चा सुरू झाली आहे.

अलीकडेच CM रेवंत रेड्डी आणि ओवेसी यांच्यातील संबंधाचे व्हिडिओ आणि विधाने समोर आलीत. विधानसभा निवडणुकीला ६ महिनेही झाले नाहीत. परंतु ओवेसी आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध सुधारल्याचं दिसून येते. त्यामागे हैदराबादमधील राजकीय समीकरण असू शकतात कारण यंदा भाजपाने या मतदारसंघात मोठी रणनीती आखली आहे.

हैदराबाद इथं ओवेसी यांचा पाचव्यांदा विजय होईल असं बोललं जात होते. परंतु भाजपानं या मतदारसंघात त्यांच्या फायरब्रँड नेत्या माधवी लता यांना मैदानात उतरवलंय. त्यामुळे ओवेसींना तगडं आव्हान निर्माण झालं आहे. माधवी लता यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस आणि ओवेसी यांनी रणनीती बदलली आहे. काँग्रेसकडून बलाढ्य व्यापारी अली मस्कडी, २ वेळा ओवेसींचा सामना केलेले माजिद खान आणि स्थानिक नेतृत्व समीरुल्लाह यांच्या नावाचा विचार सुरू आहे.

ओवेसी यांनी त्यांचा गड शाबूत ठेवण्यासाठी कायम राज्य सरकारसोबत साम्यजस्याची भूमिका घेतल्याचं बोललं जाते. याआधी टीडीपी, मग काँग्रेस त्यानंतर बीआरएससोबत ते राहिले. अशात आता तेलंगणात काँग्रेस सरकार आहे. भलेही काँग्रेसला उघडपणे ओवेसींसोबत एकत्र येत देशात वेगळा संदेश द्यायचा नाही. परंतु पडद्यामागून राजकीय तडजोडी होत असल्याची चर्चा आहे.

जर स्थानिक समीकरणे पाहिली तर काँग्रेसनं याठिकाणी ताकदीचा मुस्लीम चेहरा रिंगणात उतरवला तर एमआयएम आणि काँग्रेसमध्ये मत विभाजन होऊ शकते. त्याचा थेट फायदा भाजपाला होईल जे ओवेसी आणि काँग्रेस दोघांना नको. काँग्रेस आणि MIM मध्ये अधिकृतपणे आघाडी नाही परंतु या मतदारसंघात कमकुवत उमेदवार उतरवून ओवेसींची मदत केली जाऊ शकते.

सूत्रांच्या दाव्यानुसार, जर काँग्रेसनं पडद्यामागून मदत केली तर ओवेसी बिहार, यूपी आणि अन्य राज्यात निवडणूक लढून काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे जे नुकसान करणार होते, ते मोठ्या प्रमाणात करणार नाहीत. त्यामुळे ओवेसी इतर राज्यात उमेदवार उतरवण्यावर विचार करतील.

नुकतेच CM रेवंत रेड्डी आणि ओवेसी हे दोघे इफ्तारनिमित्त एकत्र आल्याचं दिसले, त्यात ते एकमेकांचे कौतुक करत होते. हैदराबादमध्ये तुमच्यामुळे ओवेसी आणि त्यांचे आमदार जिंकतात, मीदेखील त्यांना हरवू शकत नाही. हैदराबादच्या विकासासाठी एमआयएमलासोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असं CM रेवंत रेड्डी यांनी म्हटलं.

तर तेलंगणामध्ये गंगा,जमुना तहजीब आणखी मजबूत होईल. आमच्या पक्षाकडून सरकारला पूर्ण सहकार्य केले जाईल. राज्यात जे द्वेषाचे राजकारण करतात त्यांच्यापासून जनतेचं संरक्षण करणं आमचं काम आहे असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं.

दरम्यान, भाजपा उमेदवार माधवी लता म्हणाल्या की, आम्हाला अपेक्षा आहे काँग्रेस, एमआयएम वेगवेगळे उमेदवार देतील. काँग्रेस आणि एमआयएम गुप्त आघाडी करत आहेत असं सांगितलं. तर BRS, काँग्रेस आणि ओवेसी यांच्या पक्षाचा DNA एकच आहे हे तिन्ही पक्ष मिळून हिंदुविरोधात काम करतात असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी केला आहे.