मराठी मतदार, हिंदुत्व कार्ड, राज ठाकरेंचा करिश्मा; भाजपाला मनसेची गरज का पडली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 02:55 PM2024-03-19T14:55:10+5:302024-03-19T14:58:36+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तीन मोठे पक्ष भाजपा-एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी असूनही मनसेला सोबत घेण्याची महाराष्ट्रात एनडीएला काय गरज आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत

राज्यात मनसेचा एकच आमदार आहे. संघटनाही फारशी ताकदवान नाही. अशास्थितीत मनसेच्या एनडीएमधील एन्ट्री मागची नेमकी ५ मोठी कारणं काय याबाबत राजकीय तज्ज्ञ विविध तर्कवितर्क लढवत आहेत.

लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि आसपासच्या भागात उद्धव ठाकरे- काँग्रेस युतीमुळे किती नुकसान होऊ शकते हे भाजपाला अजून स्पष्ट होत नाहीये. गेल्या वेळी मुंबईतल्या सर्व जागा एनडीएने जिंकल्या होत्या.

अशावेळी भाजपा यावेळीही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. पक्षासाठी हे आकडे फार महत्त्वाचे आहेत. विशेषत: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कोणतीही जागा जिंकल्यास त्यांच्या पक्षाला मोठी उभारी मिळेल. त्यासाठी भाजपाला राज ठाकरेंचा मोठा चेहरा सोबत घेण्याची गरज भासत आहे.

गेल्या अनेक सर्वेक्षणात महाविकास आघाडी आणि एनडीए यांच्यातील मतांमध्ये ४ टक्के अंतर दिसून येत आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, अद्यापही सुमारे १५ टक्के मते अनिश्चित आहेत. ही मते ऐनवेळी कुणाच्याही बाजूने झुकू शकतात. त्यामुळे ही मते आपल्या बाजूने आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करतेय.

या पार्श्वभूमीवर भाजपाकडून राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. विशेषत: दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा सुरू झाली. त्याचा परिणाम मुंबई आणि आसपासच्या परिसरात दिसून येणार आहे.

शिवसेनेचा मूळ मराठी मतदार अजूनही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असल्याचे भाजपाला वाटत असल्याने आणि ही मते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाच्या वाट्याला येतील अशी शक्यता कमी आहे. अशा स्थितीत राज ठाकरेंसारखा चेहरा एनडीएसोबत असेल तर किमान मनसेची मते एकत्र आणण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो.

दुसरीकडे राज ठाकरे यांचीही एनडीए आघाडीत सामील होणे ही मजबुरी आहे. त्यांच्या पक्षाचा आलेख हळूहळू खाली जात आहे. मनसेची एक ते दोन टक्के मते शिल्लक असल्याचे गेल्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपा आणि पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला होता. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी यू-टर्न घेत पंतप्रधान मोदींना विरोध केला. राज ठाकरेंच्या पक्षाने २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढवली नाही.

उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये गेल्याने हिंदुत्वाला मानणाऱ्या मराठी मतांची पिच रिकामी झाली असून भाजपाच्या पाठिंब्याने संघटना मजबूत करण्याची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, असे राज ठाकरे यांना वाटते. राज ठाकरेंवरही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. अशा स्थितीत एनडीएमध्ये सामील होऊन राज ठाकरे पक्षाला तर वाचवू शकतीलच शिवाय लोकसभेतील मतदानाची टक्केवारीही वाढवू शकतील.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांची चर्चा भाजपाच्या हायकमांडशीच होत आहे. यामध्ये शिंदे गट किंवा अजित पवार गटाचा समावेश करण्यात आलेला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, युतीची जी काही चर्चा होईल, ती भाजपासोबतच होईल. यामध्ये विधानसभेच्या जागांवरही चर्चा होऊ शकते. सध्या महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची तयारी सुरू आहे.