पालकमंत्रिपदाचा ट्विस्ट: रायगडच्या बदल्यात नाशिक शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?; हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 21:42 IST2025-01-05T21:37:04+5:302025-01-05T21:42:13+5:30
नाशिकचे पालकमंत्रिपद शिंदेसेनेचे दादा भुसे यांना देण्याची देखील चर्चा वरीष्ठपातळीवर सुरू असल्याचे समजते.

राज्यातील पालकमंत्रिपदाची नावे लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिकमधून दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा होईल, असा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा अंदाज होता. मात्र, भुजबळ यांना धक्कादायकरीत्या मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अॅड. माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांचा समावेश झाल्यानंतर कोकाटे आणि भुसे यांच्यात स्पर्धा सुरू झाली. याचदरम्यान, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाव आले आणि दोघात तिसरा अशी स्थिती निर्माण झाली.
राज्यात ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याच पक्षाचा पालकमंत्री अशाप्रकारचे सूत्र स्वीकारल्याचे सांगण्यात आले होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्याचे सूतोवाच करीत बाहेरील जिल्ह्याचा पालकमंत्री चालणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली होती. परंतु, आता पुन्हा पालकमंत्रिपदाची स्पर्धा सुरू झाली आहे.
दादा भुसे आणि अॅड. माणिकराव कोकाटे यांची स्पर्धा कायम असली, तरी आता गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दोन वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे, यापूर्वीच्या कुंभमेळ्याचा अनुभव असल्याने आता महाजन यांना पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्रिपद त्यांना दिले जाण्याची देखील शक्यता आहे, तर दुसरीकडे दादा भुसे हे मात्र पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळणार याची खात्री बाळगून आहेत.
रायगडच्या बदल्यात शिंदेसेनेला नाशिकची जागा? पालकमंत्री पदावरून सर्वच ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे रायगडला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद, तर नाशिकचे पालकमंत्रिपद शिंदेसेनेचे दादा भुसे यांना देण्याची देखील चर्चा वरीष्ठपातळीवर सुरू असल्याचे समजते.
२६ जानेवारीच्या आत होणार घोषणा- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते, त्यामुळे आता पालकमंत्री नियुक्त्ती लवकर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.