45 वर्षांनंतरही 'शोले' सिनेमातील 'या' चुका कधी लक्षातही आल्या नसतील, तुम्हाला दिसल्या का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:11 PM2020-08-15T15:11:25+5:302020-08-15T15:48:34+5:30

आता हा सिनेमा दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टीव्हीवर बघायला मिळतो. या सिनेमात मैत्री, रोमान्स, अ‍ॅक्शन आणि ट्रॅजेडी सगळंच बघायला मिळतं.

बॉलिवूडचा सर्वात गाजलेला आणि ऐतिहासिक यश मिळवलेल्या 'शोले' सिनेमाला आज ४५ वर्षे झालीत. हा सिनेमा तसा १४ ऑगस्ट १९७५ ला मुंबईतील मिनरवा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर १५ ऑगस्टला देशातील इतर ठिकाणांवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. आता हा सिनेमा दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टीव्हीवर बघायला मिळतो. या सिनेमात मैत्री, रोमान्स, अॅक्शन आणि ट्रॅजेडी सगळंच बघायला मिळतं. पण डायरेक्टरच्या काही चुकांमुळे सिनेमात काही मजेदार चुका बघायला मिळतात. चला जाणून घेऊ काय आहेत त्या चुका...

1) शोलेतील धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवरील सीन सर्वांनाच माहीत असेल. पण या सीनमधील एक गोष्टीवर प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे या गावात वीजच नाही तर मग या टाकीत पाणी कसं चढवलं जात होतं?

2) जेव्हा डाकू बसंतीचा पाठलाग करतात तेव्हा बसंती टांग्याने स्टंट करत लाकडी पूल तोडते. ज्यामुळे पाठलाग करत येणाऱ्या डाकूंना दुसऱ्या रस्त्याने जावं लागतं. वीरूला पूल तुटलेला दिसतो. पण जेव्हा जय आणि वीरू बसंतीला डाकूंपासून वाचवून परत येतात तेव्हा त्या सीनमध्ये तोच लाकडी पूल पूर्णपणे ठिक असतो.

३) एका सीनमध्ये नाव्ही बनलेले केश्टो मुखर्जी जेलर असरानी यांना जय आणि वीरूचा तुरूंगातून पळून जाण्याचा प्लॅन सांगायला येतो. यावेळी ऑफिसमधील घड्याळात तीन वाजलेले असतात. पण त्यानंतर जेव्हा जय आणि वीरू जेलरला भेटायला येतात तेव्हाही या घड्याळात तीनच वाजलेले असतात.

४) जेव्हा गब्बर तीन डाकूंना गोळ्या मारतो तेव्हा ते तिघेही गब्बरच्या समोरासमोर उभे असतात. गब्बर तिघांनाही समोरून गोळी मारतो. पण नंतर डाकूंच्या पाठीवर आणि मागे मानेवर गोळ्या मारलेल्या दिसतात.

५) एका सीनमध्ये बसंती पायी चालत मंदिरात येते. तिथे वीरू तिला विचारतो की, धन्नो कुठे आहे. पण जेव्हा मंदिरातून ती परतते तेव्हा टांगा बाहेर उभा असतो. बसंती तर टांगा घरी ठेवून आली होती. मग मंदिराबाहेर कसा आला?

6) शेवटच्या सीनमध्ये जेव्हा जय पूलाजवळ येतो तेव्हा त्याचे दोन्ही हात मोकळे दिसतात. पण जेव्हा जय वीरूजवळ अखेरचा श्वास घेतो तेव्हा त्याच्या हातात नाणं दिसतं. म्हणजे जयने मरताना नाणं खिशातून काढलं होतं का?

7) डाकूंसोबत लढताना जय जमिनीवर लेटून पिस्तुल चालवतो. त्याच्या एका गोळीने दोन डाकू घोड्यावरून खाली पडतात आणि मरतात. एका गोळीत दोन लोक कसे मरतात?

8) ठाकूर जेव्हा गावात येतो तेव्हा त्याच्या परिवारातील सगळ्या सदस्यांच्या मृतदेहावर कापड असतो. ठाकूर जेव्हा लहान मुलाच्या शरीरावरील कापड काढतो तर तो कापड उडून जातो. त्यानंतर जेव्हा ठाकूर गब्बरला मारण्यासाठी जात असतो तेव्हा लहान मुलाच्या मृतदेहावर कापड असतो.