कधी 'बिल्ला' नावाने प्रसिद्ध होता हा बॉलिवूडचा खतरनाक व्हिलन, पण अचानक गायब कुठे झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:10 PM2022-01-14T13:10:29+5:302022-01-14T13:16:57+5:30

Manik Irani Aka Billa : ६ फूट उंच हा व्हिलन जेव्हा पडद्यावर येत होता तेव्हा हिरोवरही भारी पडत होता. त्याचं शरीर भक्कम दिसत होतं, जणू तो हिरोचे हाय पाय सहज मोडून फेकेल.

बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये व्हिलनची एक वेगळी जागा आहे. अनेक व्हिलन हे आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. एका हिरोला हिरो बनवण्यातही व्हिलनचा मोठा हात असतो. बॉलिवूडमध्ये ८०-९० च्या काळात एकापेक्षा एक व्हिलन झाले. त्यांच्या भूमिका इतक्या जबरदस्त होत्या की, आजही त्या विसरल्या गेल्या नाहीत. ८०च्या दशकातील असाच एक व्हिलन म्हणजे माणिक ईराणी.

माणिक ईराणीला तुम्ही कदाचित त्याच्या खऱ्या नावाने ओळखतही नसाल. कारण त्याला तर सगळेच बिल्ला म्हणून ओळखतात. बिल्ला नावाची भूमिका त्याने केली आणि तो बिल्ला म्हणून अजरामर झाला.

६ फूट उंच हा व्हिलन जेव्हा पडद्यावर येत होता तेव्हा हिरोवरही भारी पडत होता. त्याचं शरीर भक्कम दिसत होतं, जणू तो हिरोचे हाय पाय सहज मोडून फेकेल.

माणिक ईराणीने १९७४ मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. 'पाप और पुण्य' सिनेमात त्याने एका बदमाश व्यक्तीची भूमिका केली होती. त्याची ती भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली. त्यानंतर १९७६ मध्ये आलेल्या कालीचरणमध्ये मुक्या गुंडाची भूमिका केली.

'त्रिशूल' सिनेमात तर त्याने अमिताभ बच्चनची चांगलीच धुलाई केली होती. त्यानंतर माणिक अमिताभ बच्चनच्या अनेक सिनेमात व्हिलन म्हणून दिसला. मिस्‍टर नटवरलाल', 'शान', 'नास्‍त‍िक' या सर्व सिनेमात त्याने अमिताभ सोबत काम केलं. असं म्हणतात की, १९७८ मध्ये आलेल्या 'डॉन' सिनेमात त्याने अमिताभ बच्चनच्या बॉडी डबलचं काम केलं होतं. पण यासाठी त्याला क्रेडीट मिळालं नाही.

'हिरो' सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष घई यांनी केलं होतं आणि त्यांनी यातून जॅकी श्रॉफला लॉन्च केलं होतं. याच सिनेमाने माणिक ईराणीला बिल्ला नावाने लोकप्रिय केलं. या सिनेमात त्याचा लूक जबरदस्त तर होताच, सोबतच त्याची डायलॉग डिलीव्हरीही कमाल होती.

अशात असा प्रश्न सहाजिक आहे की, ज्या कलाकाराने इतक्या सिनेमात काम केलं. इतक्या मोठ्या हिरोंसोबत काम केलं. तो त्याच्या करिअरची पीकवर होता, तो अचानक गायब कुठे झाला?

माणिकला दारूचं व्यसन लागलं होतं. जसंजसं त्याचं करीअर वाढत गेलं तसतशी त्याची दारूची सवय वाढत गेली. तो अखेरचा १९९२ मध्ये आलेल्या 'दीदार' सिनेमात दिसला होता. असं म्हणतात की, दारूच्या व्यसनाने त्याचा जीव घेतला. त्याच्या मृत्यूचं खरं कारण कुणालाच माहीत नाही. काही लोक म्हणतात की, त्याने आत्महत्या केली होती. पण ठोसपणे असं कुणीच सांगत नाही.