मोहित बघेलला कोरोनाच्या भीतीने मिळाला नाही रुग्णालयात प्रवेश, वाचा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:32 PM2020-05-25T15:32:41+5:302020-05-25T15:35:52+5:30

अभिनेता मोहित बघेलचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला.

2011 मध्ये मोहितने सलमान खानसोबत 'रेड्डी' चित्रपटात छोटे अमर चौधरी ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने 'जय हो' या सुपरहिट चित्रपटातही भूमिका साकारत आपली वेगळी ओळख बनवली होती.

इतक्या लहान वायत मोहितने जगाचा निरोप घेतला ही बातमी ऐकताच सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मोहितचे मथुरामध्ये निधन झाले. त्याच्यावर अनेक वर्षांपासून एम्समध्ये उपचार सुरू होते. पण शनिवारी त्याची तब्येत ढासळल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसच्या भीतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही.

मोहितला रुग्णालयात दाखल करण्यास मनाई करण्यात आली या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता जागरणने वृत्त दिले आहे की, मथुरामधील नयती रुग्णालयात नेत असतानाच त्याचे निधन झाले. मोहितच्या कुटुंबियांनीच जागरणला ही माहिती दिली आहे.

मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

मोहित बंटी औौर बबली २ या चित्रपटात लवकरच झळकणार होता. या चित्रपटासाठी त्याने जानेवारीत चित्रीकरण करायला देखील सुरुवात केली होती.

मोहितने गली गली चोर है, इक्कीस तोफो की सलामी यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.