कधीकाळी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात ललिता पवार, एका ‘थप्पड’ने बदलले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 01:15 PM2021-04-18T13:15:38+5:302021-04-18T13:26:52+5:30

त्या प्रसंगापासून Lalita Pawar यांना नायिकेच्या भूमिका सोडून चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या, पण त्या भूमिका सुध्दा एवढ्या गाजल्या की ललिता पवार हे नाव भारतीय चित्रपटांत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचा आज (18 एप्रिल) वाढदिवस आहे. ललिता पवार आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका कुणीही विसरू शकत नाही.

हिंदी, मराठी आणि गुजराती असे 700 वर सिनेमे करणा-या ललिता यांनी अनाडी, श्री420, मिस्टर अँड मिसेस 55 या सिनेमात यादगार भूमिका साकारल्या.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी साकारलेली मंथराची भूमिकाही यादगार व ऐतिहासिक ठरली.

ललिता यांनी मोठ्या पडद्यावर खाष्ट सासूच्या अनेक भूमिका साकारल्या. पण याच ललिता पवार कधीकाळी ग्लॅमरस रोलसाठी ओळखल्या जात.

बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. पुढे अभिनेत्री म्हणून नवी इनिंग सुरु केल्यानंतर ललिता यांनी अनेक बोल्ड फोटोशूट केले होते. त्या काळात असे फोटोशूट खूप मोठी गोष्ट होती.

ललिता यांचा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि या हिटने त्यांच्या करिअरला गती दिली. त्याकाळात सर्वाधिक फी घेणा-या अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जात.

करिअरच्या शिखरावर असताना एका घटनेने मात्र त्यांचे पुरते आयुष्य बदलले होते. ‘जंग ए आजादी’ या सिनेमाचे शूटींग सुरू होते.

या सिनेमाच्या एका सीनमध्ये भगवान दादा यांना ललिता यांना थप्पड मारायची होती. या सीनमध्ये भगवान दादांनी ललितांना इतकी जोरदार थप्पड लगावली की, ललिता जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले.

कानाचा उपचार सुरु असताना डॉक्टरांनी ललिता यांना चुकीची औषधे दिलीत आणि या औषधांमुळे त्यांना लकवा मारला. यामुळे त्यांचा डावा डोळ्यात दोष निर्माण झाला. सतत तीन वर्षे उपचार करून देखील त्यांच्या डोळ्यातील हा दोष दूर झाला नाही.

यानंतर नायिकेच्या भूमिका मिळणार नव्हत्याच. यामुळे त्यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारायला सुरुवात केली. चरित्र अभिनेत्रींच्या भूमिकाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने पडद्यावर जिवंत केल्या.