Aryan Khan Drug Case: आर्यन खानच्या अटकेनं स्टार किड्स धास्तावले; अनेकजण देश सोडण्याच्या तयारीत; त्या ट्विटनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 06:28 PM2021-10-14T18:28:05+5:302021-10-14T18:37:58+5:30

Aryan Khan Drug Case: आर्यन खानला अद्याप जामीन नाही; तुरुंगातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला; स्टार किड्स भीतीच्या छायेत

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं जवळपास दोन आठवड्यांपूर्वी अटक केली. एका क्रूझ बोटीवरून आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं. या सगळ्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून आर्यनला आर्थर रोड तुरुंगातील क्वारंटिन कक्षात ठेवण्यात आलं होतं. मात्र आता त्याची रवानगी बरॅकमध्ये करण्यात आली आहे. आर्यनच्या सुरक्षेसाठी शाहरुख आणि गौरी खानचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. तर दुसरीकडे इतर स्टार किड्स आणि त्यांच्या पालकांची चिंतादेखील वाढली आहे.

अनेक प्रख्यात व्यक्तींची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदेंनी आर्यनच्या वतीनं न्यायालयात युक्तिवाद केला. मात्र मानेशिंदेंना आर्यनला जामीन मिळवून देता आला नाही. त्यानंतर अमित देसाईंनी आर्यनची बाजू मांडली. मात्र यानंतरही आर्यनचा मुक्काम तुरुंगातच आहे.

आर्थर रोड तुरुंगात आणल्यापासून आर्यन खान व्यवस्थित खात नसल्याची माहिती समोर आली आहे. तो केवळ कँटिनमधून पार्ले-जी बिस्किट्स घेऊन दिवस ढकलत आहे. दुसरीकडे आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी शाहरूख आणि गौरीचे सुरू असलेले प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत.

आर्यन खानला आजही जामीन मिळालेला नाही. न्यायमूर्तींनी त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरुच ठेवली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

आर्यन खानच्या अडचणी संपत नसताना चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांची मुलं धास्तावली आहेत. किंग खान शाहरुखचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकू शकतो. तर मग कोणीही अडकू शकतं, अशी चिंता अनेकांना वाटू लागली आहे.

अभिनेता कमाल आर. खाननं याबद्दल एक ट्विट केलं आहे. आर्यन खान प्रकरणानंतर बरेच स्टार किड्स भारत सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिल्याचं केआरकेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. आर्यनसोबत असं घडू शकतं, तर मग कोणासोबतही घडू शकतं, अशी भावना त्यांच्या मनात आहे, असं केआरकेनं ट्विटमध्ये पुढे नमूद केलं आहे.

बॉलीवूडमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलीवूडमधील स्टार किड्स सध्या चिंतेत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीनं बॉलीवूड आणि ड्रग्ज पार्ट्यांचं कनेक्शन उघडकीस आणलं. अनेक बड्या सेलिब्रिटीजना एनसीबीनं कार्यालयात चौकशीला बोलावलं. त्यानंतर आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. त्यामुळे पुढचा नंबर आपला तर नसेल अशी भीती अनेकांना सतावत आहे.

Read in English