Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच राहुल गांधी विदेशात पळाले : योगी आदित्यनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 14:29 IST2019-10-10T14:21:46+5:302019-10-10T14:29:16+5:30
दहशतवादाचा समुळ नायनाट करण्याचे काम सुरू

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताच राहुल गांधी विदेशात पळाले : योगी आदित्यनाथ
सेलू : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसर्यांदा स्थापन होताच दहशतवाद पुर्णपणे नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बलशाली राष्ट्र म्हणून देशाची ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी सेलू येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले.
महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ पाथरी रस्त्यावरील बोर्डीकर यांच्या मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा गुरुवारी सकाळी अकरा वाजता झाली. यावेळी महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर नगराध्यक्ष विनोद बोराडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, मोदी सरकार येण्यापूर्वी देशात धर्म जात भाषा प्रांत या नावावर देशाला तोडण्याचे काम केले जाते होते. देश कमजोर केला जात होता. त्यामुळे पाकिस्तान सारखा देश भारताला आव्हान उभे करत होता. पंरतू मोदी सरकार परत एकदा केंद्रात येताच दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला जात आहे. जम्मू काश्मीर मध्ये कलम ३७० हटवणे म्हणजे दहशतवाद कायमचा नष्ट करण्याचे काम सुरू आहे असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. पाच वर्षांत भाजप सरकारने दहा कोटी शौचालय बांधले. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत शुध्द पिण्याचे पाणी देण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. देशात कुठलाही भेदभाव न करत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कल्याणकारी आणि विकासाच्या विविध योजना प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार मेघना बोर्डीकर यांचे भाषण झाले
राहुल गांधी विदेशात पळाले
महाराष्ट्रातील कोल्हापूरला पूर आला तेव्हा राहूल गांधी इटलीत होते. आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू होताच राहूल गांधी विदेशात पळाले अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.