"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 20:14 IST2026-01-12T20:10:43+5:302026-01-12T20:14:01+5:30
Ganesh Naik Eknath Shinde: श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गणेश नाईकांनी थेट आव्हान दिले. मी हरलो तर राजकारण सोडेन, तुझे वडील हरले तर त्यांना राजकारण सोडायला सांग, असे गणेश नाईक म्हणाले.

"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
"उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की, तू गणेश नाईकला हलक्यात घेतलं आहेस. तुझा पोरगा मला बोलतो की, माझे वय झाले आहे. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये १२ किलोमीटर चालला. कोपरखैरणेला दहा किलोमीटर चालला. तुझ्या बापाला न थांबता गणेश नाईकसोबत चालायला सांग, गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईन", असे म्हणत भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.
प्रचारसभेत बोलताना गणेश नाईक म्हणाले, "ठाण्यातील तो उपमुख्यमंत्री काय बोलतोय, सरकार बदली करायचं आहे. अरे सरकार काय... ठाण्यात अर्ध्या भागातील मलनिस्सारण खाडीमध्ये जाते. नवी मुंबई महापालिकेमध्ये १५ लाखांची वस्ती आहे, पण ३० लाखांची मलनिस्सारणाची सोय करून ठेवली आहे", असे गणेश नाईक म्हणाले.
दोन तासांत कोठडीत घालेन -गणेश नाईक
"माथाड्यांचे नेते म्हणून कुणी इथे जास्त हुशारी करायला आला ना, तर त्यांची नेतेगिरी काढल्याशिवाय गणेश नाईक राहणार नाही. मर्यादेत वागा. गोरगरिबांना दमदाटी करायची नाही. जनतेला आवाहन करा. जनतेला तुमचं म्हणणं पटलं, त्यांनी तुम्हाला मते दिली, तुम्ही निवडून आला, तर त्यावर कुठलीही हरकत नाही. पण, गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला, तर एक अर्ज करा. एक पोलिसांना आणि एक मला पाठवा. दोन तासाच्या आत कोठडीत घालेन. जोपर्यंत मस्ती उतरत नाही, तोपर्यंत बाहेर येऊ देणार नाही", असा इशारा गणेश नाईकांनी शिंदेसेनेच्या नेत्यांना दिला.
"तुमचे कोण गॉडफादर असतील ना, त्यांना पण जाऊन सांगा की, गणेश नाईक असे बोलले. आम्ही गुंडागर्दी करणार नाही, पण कुणी केली, तर सहन पण करणार नाही. काही अडथळ आला, तर मेसेज करा", असे गणेश नाईक उपस्थितांना म्हणाले.
'दहा वर्षे महाराष्ट्र मागे नेला'
"मी चार वेळा मंत्री असताना कुणाचे पाणी सुद्धा प्यायलो नाही. याने तर ओरबाडले. महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला. लूट केली. नवी मुंबई महापालिकेच्या तीन हजार कोटींच्या एफडी ८०० कोटींवर आणल्या. मी लक्ष दिल्यानंतर त्या थांबल्या. त्यांच्या चमच्यांच्या वार्डमध्ये शंभर-शंभर कोटींची कामे झाली. गरिबांच्या वार्डमध्ये दहा लाखांची कामे झाली नाहीत", असे घणाघाती हल्ला गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर केला.
"सानपाडामध्ये उपमुख्यमंत्री काय बोलले? माझ्या नादाला लागू नका. मला हलक्यात घेऊ नका. टांगा पलटी घोडे फरार. उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की, तू गणेश नाईकला हलक्यात घेतलं आहेस. तुझा पोरगा मला बोलतो की, माझे वय झाले आहे. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये १२ किलोमीटर चालला. कोपरखैरणेला दहा किलोमीटर चालला. तुझ्या बापाला न थांबता गणेश नाईकसोबत चालायला सांग, गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईन, नाहीतर तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग", असे आव्हान गणेश नाईकांनी श्रीकांत शिंदेंना दिले.
'तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या खाव्या लागतात'
"फिटनेसच्या काय गोष्टी... काही काही लोक पंचविशीमध्ये वयोवृद्ध होतात. आशाहीन, दिशाहीन... आम्ही आशाहीनही नाही आणि दिशाहीनही नाहीत. आम्ही आत्मविश्वासाने उभे आहोत. गणेश नाईकने ठरवले ना, तर तुमचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करेन. बोलतोय, करून दाखवेन. माझ्या नादाला लागायचं नाही. माझ्याएवढा सुखी राजकारणी कुणी नाही. कोणताही ताण नाही. मला रात्री तीन गोळ्या खायला लागत नाही. मी पाच मिनिटात झोपतो. त्यांना तीन तीन गोळ्या घ्यायला लागतात. कधी कधी चक्कर येते. मी कधीही चिडल्यावर मुरबाडच्या शेतात जात नाही, हे लगेच दरे गावात जातात", अशा शब्दात गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचले.