नवी मुंबईत भाजपामध्ये अंतर्गत वादाचे वारे; नाईकांविरोधातील नाराजीचा शिंदेसेनेला होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:22 IST2026-01-05T13:17:42+5:302026-01-05T13:22:05+5:30

Navi Mumbai Municipal Election 2026, Eknath Shinde Shiv Sena: भाजपने नाईक समर्थकांना उमेदवारी दिल्याने म्हात्रे गटात अस्वस्थता वाढल्याच्या चर्चा

navi mumbai municipal election 2026 internal dispute brewing within BJP mla manda mhatre ganesh naik may benefits eknath shinde shiv sena | नवी मुंबईत भाजपामध्ये अंतर्गत वादाचे वारे; नाईकांविरोधातील नाराजीचा शिंदेसेनेला होणार फायदा?

नवी मुंबईत भाजपामध्ये अंतर्गत वादाचे वारे; नाईकांविरोधातील नाराजीचा शिंदेसेनेला होणार फायदा?

Navi Mumbai Municipal Election 2026, Eknath Shinde Shiv Sena: राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढत आहेत. पण त्याजवळच असलेल्या नवी मुंबई पालिकेत मात्र शिंदेसेना आणि भाजप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नवी मुंबई क्षेत्रात भाजपकडे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोन अनुभवी आमदार आहेत. दुसरीकडे या महापालिका क्षेत्रात शिंदेसेनेचेही चांगले वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत भाजप विरूद्ध शिंदेसेना असा थेट सामना होत असल्याने, लढती चुरशीच्या होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण नवी मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आणि मिठाचा खडा पडला. उमेदवार निवडीबाबत गणेश नाईक यांच्या समर्थकांना स्थान देत असताना, पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले आणि वर्षानुवर्षे पक्ष संघटनेत काम करत असलेल्या निष्ठवंतांना घरचा रस्ता दाखविल्याने अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले आहेत. परिणामी जुन्या, जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून त्याचा भाजपाला फटका आणि शिंदेसेनेला फायदा होऊ शकतो अशी कुजबूज सुरु झाली आहे.

दोघांचं भांडण, तिसऱ्याला लाभ?

विधानसभा निवडणुकांच्या हंगामात बेलापूर विधानसभा मतदारसंघात संदीप नाईक यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर, त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. या काळात नाईकांविरोधात मंदा म्हात्रे समर्थकांनी रणशिंग फुंकलेले होते. मंदा म्हात्रे या भाजपच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्यांनी मंदा म्हात्रेंचा जोरदार प्रचार केला. परिणामी म्हात्रे जिंकल्या आणि संदीप नाईक यांना पराभव झाला. आता काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकींचा विचार करून, संदीप नाईक पुन्हा भाजपवासी झाले. त्यानंतर भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी देताना, संदीप नाईक यांचा विधानसभेवेळी ज्यांनी प्रचार केला, त्यांना उमेदवारी देण्यात आली असून, भाजपचे निष्ठावान, जुने-जाणते आणि मंदा म्हात्रे समर्थक या सर्वांना यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे भाजपच्या एका गटात प्रचंड अस्वस्थता पसरली असून या दोघांच्या वादात शिंदेसेनेच्या उमेदवारांना याचा फायदा होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारांच्या यादीखालील स्वाक्षरीवरून मोठा वाद

नेरूळ भागातील कुणाल महाडिक, भास्कर यमगर, सुहासिनी नायडू, सीवूड्स येथील दत्ता घंगाळे, पांडुरंग आमले, आबा जगताप यासारख्या इच्छुकांना यंदा उमेदवारी मिळेल अशी आशा होती. यापैकी दत्ता घंगाळे, राजू शिंदे हे रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पण मंदा म्हात्रे यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार करणाऱ्या कुणालाही उमेदवारी मिळणार नाही, अशी रणनीती नाईक यांनी आखली. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या घरातील दोन उमेदवारांना संधी दिली गेली असली तरी इतर उमेदवारांबाबत त्यांनी विश्वासात घेतले नसल्याचेच चित्र आहे. संजीव नाईक यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने यादी प्रसिद्ध केल्याने पक्षाचे उमेदवार ठरवताना जिल्हाध्यक्षांच्या संमतीशिवाय परस्पर नावे ठरवली गेल्याचा आरोप सुरु आहे. यातूनच भाजपत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.

दरम्यान, नवी मुंबईत २८ प्रभागांत ४९९ उमेदवार रिंगणात आहेत. छाननीत एकूण ८३९ अर्ज वैध ठरले तर ११७ अर्ज अवैध ठरले होते. त्यापैकी शेवटच्या दिवशी २६९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

Web Title : नवी मुंबई में बीजेपी में आंतरिक कलह; क्या शिंदे सेना को होगा फायदा?

Web Summary : नवी मुंबई भाजपा में उम्मीदवार चयन पर आंतरिक कलह है, जिसमें नाइक के वफादारों का पक्ष लिया गया है। अनुभवी कार्यकर्ताओं की उपेक्षा से आगामी चुनावों में शिंदे सेना को फायदा हो सकता है, जिससे असंतोष और संभावित बदलाव बढ़ सकते हैं।

Web Title : Internal BJP conflict in Navi Mumbai; Shinde Sena to benefit?

Web Summary : Navi Mumbai BJP faces internal strife over candidate selection, favoring Naik loyalists. Neglecting veteran workers could benefit Shinde Sena in upcoming elections, fueling discontent and potential shifts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.