Zia ur Rahman: संभलचे खासदार झिया उर रहमान आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा; आरोप काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:23 IST2024-12-19T16:20:42+5:302024-12-19T16:23:50+5:30
Zia ur Rahman Barq: खासदार झिया उर रहमान बर्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या घराचा वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.

Zia ur Rahman: संभलचे खासदार झिया उर रहमान आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा; आरोप काय?
समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील खासदार झिया उर रहमान बर्क यांच्यासह त्यांचे वडील ममलूक उर रहमान बर्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज चोरी केल्या प्रकरणी आणि वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
झिया उर रहमान यांच्यावर आरोप काय?
संभलचे खासदार झिया उर रहमान यांच्याविरोधात विजेची चोरी केल्याप्रकरणी, तर त्यांच्या वडिलांविरुद्ध वीज कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ममलूक उर रहमान यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना 'सत्तांतर झाले आणि आमचे सरकार आले, तर बघून घेईन', अशा शब्दात धमकावले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी खासदार झिया उर रहमान यांच्या घराचा वीज पुरवठा बंद केला आहे.
अखिलेश यादवांची भाजपवर टीका
खासदार झिया उर रहमान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संताप व्यक्त केला.
"संभलमध्ये जे झाले आहे, ते त्यांच्याच (योगी आदित्यनाथ) यांच्या अधिकाऱ्यांनीच केले आहे. मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खेळ खेळला. आता अधिकारी यातून वाचण्यासाठी असे खेळ खेळत आहेत. तिथल्या लोकांना जाणीवपूर्वक अपमानित केले जात आहे. आज ते खासदाराच्या घरी पोहोचले. भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकांची चौकशी करावी. त्यांचे लोकही बेईमानी आणि वीज चोरी करत आहे, असे मी सांगेन", असे अखिलेश यादव म्हणाले.