इंडिया आघाडीच्या विजयाच्या आशेने पोस्टात महिलांच्या रांगा; ८,५०० रुपये मिळण्याची आशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:47 IST2024-05-30T14:39:53+5:302024-05-30T14:47:17+5:30
खाती उघडण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लावून सकाळपासून उभ्या

इंडिया आघाडीच्या विजयाच्या आशेने पोस्टात महिलांच्या रांगा; ८,५०० रुपये मिळण्याची आशा
बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये नेहमी रिकामी राहणारी पोस्ट ऑफिसेस सध्या गजबजून गेली आहेत. येथे ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ खाती उघडण्यासाठी महिलांची अभूतपूर्व अशी गर्दी सध्या होत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडण्यासाठी येणाऱ्या महिलांना आशा आहे की, लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले तर त्यांच्या खात्यात दरमहा ८,५०० रुपये जमा होतील. सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत; मात्र पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लावून उभ्या आहेत.
खाते उघडले की पैसे...
पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी आलेल्या एका महिलेने सांगितले की, ती सकाळीच रांगेत उभी होती. दुसऱ्या महिलेने सांगितले की, तिच्या भागातील प्रत्येकजण खाते उघडल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होईल, असे सांगत आहे, म्हणून ती देखील खाते उघडण्यासाठी आली आहे. बहुतांश महिला या शिवाजीनगर, चामराजपेठ आणि परिसरातील होत्या. गर्दीमुळे मोकळ्या जागेतही काही काउंटर उघडली आहेत.
अफवा कुणी पसरवली?
- गेल्या तीन दिवसांपासून ही गर्दी पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनी ही अफवा पसरवल्याचे समजते. त्यामुळे महिलांनी पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. या आमदारांनी सांगितले की, इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर ४ जूननंतर महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल.
- काँग्रेसने केंद्रात सत्तेवर आल्यास महालक्ष्मी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखांच्या खात्यात ८,५०० रुपये थेट जमा केले जातील.
टपाल विभाग त्यांच्या खात्यात २,००० रुपये किंवा ८,५०० रुपये जमा करेल या विश्वासाने लोक खाती उघडण्यासाठी येत आहेत. मात्र, हे खाते ऑनलाइन व्यवहार किंवा थेट लाभ (हस्तांतरण) योजनेसाठी वापरले जाऊ शकते.
-एच. एम मंजेश, मुख्य पोस्ट मास्टर, जीपीओ-बंगळुरु